Home राजकीय मारेगावला सोलर प्लान तयार करावा

मारेगावला सोलर प्लान तयार करावा

361

मारेगाव तालुका कॉंग्रेस कमिटीचे उर्जामंत्र्यांना साकडे

मारेगाव : दीपक डोहणे: तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने तालुक्यातील अर्थव्यवस्था तुर्तास डबघाईस आली आहे. अशातच विजेच्या लपंडावाने सिंचनाची व्यवस्था धोक्यात आल्याने मारेगाव तालुक्यात कायम स्वरुपात सोलर प्लान तयार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मारेगाव तालुका कॉंग्रेस कमेटीचे वतीने वणी येथील दौऱ्यात राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांना करण्यात आली.

आदिवासी बहुल असलेल्या मारेगाव तालुक्यात येथील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. येथील बहुतांश शेतकऱ्यांकड़े सिंचनाची व्यवस्था आहे मात्र विजेच्या लपंडावाने उभे पिक पुरते धोक्यात येवून उत्पादनात कमालीची घट  होण्याची संभाव्य शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विजेची कायम स्वरूपी उपाययोजना करण्यासाठी भालर येथून मार्डी येथे 33 केव्ही ची उपलब्धता करण्यात यावी यासाठी मारेगाव व मार्डी येथे सोलर प्लान तयार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

यासोबत नियमित कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रूपयाचे अनुदान देण्यात यावे व सोयाबीन आणि कापसाचा पिक विमा तात्काळ प्रदान करण्यात यावा अशी मागणीही निवेदनातून ऊर्जामंत्री नितिन राऊत व खा. सुरेश धानोरकर यांना करण्यात आली. यावेळी जि. प. सदस्य अरुणा खंडाळकर, तालुकाध्यक्ष मारोती गौरकार, जिल्हा सरचिटणीस रमन डोये  उपस्थित होते.