Home Breaking News भयंकर… बाळ विक्रीचा रचला घाट, पोलिसांनी दाखवली कारागृहाची वाट

भयंकर… बाळ विक्रीचा रचला घाट, पोलिसांनी दाखवली कारागृहाची वाट

1717

वणीतील चीड आणणारे कृत्य उघड

स्टिंग ऑपरेशनद्वारे सत्य आले समोर

वणी:

निपुत्रिकाना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार गुरुवार दि. 30 सप्टेंबर ला स्टिंग ऑपरेशनद्वारे समोर आल्याची भयंकर घटना वणीत घडली. 15 दिवसाचे बाळ दत्तक देण्याचा बहाणा करीत बाळ विक्रीचा  घाट रचला, बाल कल्याण समिती व पोलिसांनी शिताफीने कारवाई करत बाळाची विक्री करणाऱ्या टोळीस अटक केली असून चीड आणणारे कृत्य उघड झाले आहे.

येथील बेटी फाऊंडेशन संस्थेने 15 दिवसाचे बाळ दत्तक देण्यास उपलब्ध आहे असा संदेश सोशल मिडियावर व्हायरल केला होता. सदर संदेश अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी यांनी वाचल्यावर त्यांनी व्हायरल मेसेजची खात्री करण्यासाठी व्यूहरचना आखली.

बाल कल्याण समितीने येथील बेटी फाऊंडेशनला संपर्क साधून बाळाच्या विक्री बाबतची विस्तृत माहिती संकलित केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत महिला व बालकल्याण आयुक्त यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर यवतमाळ व अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी स्टिंग ऑपरेशनची योजना आखली.

बाळ दत्तकसाठी उपलब्ध आहे असा संदेश यवतमाळ जिल्ह्यात व्हायरल झाल्यापासून 36  तासात स्टिंग ऑपरेशन ची तयारी करण्यात आली. अकोला आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांच्या बाल संरक्षण यंत्रणांनी डमी पालक म्हणून गुरुवारी बाळ दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू केली. 3 लाख 50 हजारात बाळाचा सौदा करण्यात आला. 

बेटी फाऊंडेशन च्या सदस्यांनी बाळाच्या आई- वडिलांना 1 लाख 51 हजार रुपये देण्याचे काबुल केले होते तर उर्वरित रक्कम संस्थेचे पदाधिकारी वाटून घेणार होते.  मात्र बाल कल्याण समिती व पोलिसांच्या कारवाईने त्यांचे पितळ उघडे पडले.

अवैध बाळ दत्तक व विक्री करण्याची प्रक्रिया सुरू असताना, या 15 दिवसाच्या मुलीस प्रत्यक्ष स्टिंग ऑपरेशन करून अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील बाल न्याय यंत्रणे द्वारे कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. तर संबंधित बाळाचे आई- वडील, आणि यात सहभागी बेटी फाउंडेशनचे प्रीती कवडू दरेकर, कवडू गजानन दरेकर, गौरी बोरकुटे, मंगला किशोर राऊत व बाळाचे पालक सुनील महादेव डहाके, पंचफुला सुनील डहाके याना पोलिसांनी ताब्यात घेतले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याच्या बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी, दोन्ही जिल्ह्यातील बाल संरक्षण यंत्रणा, पोलीस विभाग यांच्यामुळे हे स्टिंग ऑपरेशन यशस्वी झाले आहे.

कारवाई दरम्यान यवतमाळ बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अडव्होकेट सुनील घोडेस्वार, जिल्हा परिविक्षा अधिकारी  गजानन जुमळे, अकोला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, सामाजिक कार्यकर्त्या वनिता शिरफुलें, रविंद्र गजभिये महिला व बाल विकास कर्मचारी, ठाणेदार व सर्व पोलीस पथकाने प्रशंसनीय कामगिरी पार पाडली आहे.