Home वणी परिसर वणीत सहा एकरात उभारणार क्रीडा संकुल…!

वणीत सहा एकरात उभारणार क्रीडा संकुल…!

250

* नवीन जागेकरिता आमदारांचे प्रयत्न

वणी:- परिसरातील खेळाडूंना सराव करिता यावा याकरिता शासनाने भालर मार्गावर क्रीडा संकुल उभारण्या करिता जागा उपलब्ध करू दिली आहे. मात्र सदर जागा खेळाडूंना सोईची नसल्याने वरोरा मार्गावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती समोर असलेल्या शासनाच्या जागेवर क्रीडा संकुल उभारण्यात यावे करिता आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार पाठपुरावा करीत आहे.

वणी शहराला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्याच बरोबर वणी शहरात अनेक उत्कृष्ट खेळाडू देखील तयार झाले आहे. टिळक चौकातील पाण्याच्या टाकी जवळ असलेल्या मैदानावर विविध खेळाचा सराव केल्या जातो. शासनाने या ठिकाणी तालुका क्रीडा कार्यालय देखील उभारले आहे. मात्र कोणताही अधिकारी पूर्णवेळा करिता उपलब्ध नाही.

राज्यात चांगले खेळाडू तयार व्हावे या करिता कोट्यवधी रुपये खर्च केल्या जात आहे. मात्र क्रीडा साहित्याची वाणवा सर्वत्र दिसून येत आहे. वणी येथे भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे. क्रीडा संकुल बांधण्यासाठी एमआयडीसी परिसरातील जागा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र देण्यात आलेली जागा खेळाडूंच्या सोईची नाही. शहरापासून लांब असलेल्या या जागे कडे जाण्याकरिता खेळाडूंना राज्य मार्ग ओलांडून जावे लागणार असून ते धोक्याचे आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाची सहा एकर जागा आहे. या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण करून पक्के घर बांधले आहे. या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्या करिता आमदार बोदकुरवार प्रयत्नशील आहे.सदर जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची असल्याने पंचायत समिती सभापती संजय पिंपलशेंडे यांनी पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत जागा क्रीडा संकुला करिता देण्याचा  ठराव पारित करून घेतला आहे.

सदर ठराव घेऊन आमदार बोदकुरवार आणि पंचायत समिती सभापती संजय पिंपलशेंडे यांनी जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदचे मुख्यकार्यपालन अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष यांची भेट घेऊन ही जागा क्रीडा संकुला करिता देण्याची मागणी केली आहे. सदर जागेवर  क्रीडा संकुल उभे राहिल्यास त्याचा फायदा खेळाडूंना होऊन चांगले खेळाडू नक्कीच तयार होतील यात शंका नाही.