Home Breaking News काँग्रेस, भाजपाच्या बालेकिल्ल्यात मनसेची ‘एन्ट्री’

काँग्रेस, भाजपाच्या बालेकिल्ल्यात मनसेची ‘एन्ट्री’

883
C1 20240404 14205351
मतदारसंघात नॉन स्टॉप पक्ष प्रवेशाची शृंखला

वणी: वणी विधानसभा क्षेत्रात मनसेने संघटनात्मक बांधणीत कमालीची मुसंडी मारली आहे. राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर व पदाधिकारी झपाटल्यागत मतदारसंघ पिंजून काढत आहे. काँग्रेस, भाजपाच्या बालेकिल्ल्यात महिला, पुरुष व तरुणाईचा ‘जथ्था’ मनसेत एन्ट्री करताहेत. यामध्ये अन्य राजकीय पक्षातील मात्तबरांचा समावेश असल्याने अनेकांना धडकी बसणार आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात संघटना बांधणीच्या बाबतीत सध्यस्थीतीत मनसे अव्वल आहे. तर भाजपा वगळता अन्य राजकीय पक्षाचे नेमके चाललंय काय हेच कळायला मार्ग नाही. शिवसेनेत झालेले दोन गट.काँग्रेस पक्षात गटबाजीला आलेला उत तर अस्तित्वहीन असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस यामुळे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात प्रबळ लढती, भाजपा विरुद्ध मनसेतच होणार असे आजचे चित्र आहे.

मनसेच्या माध्यमातून मागील वर्षभराच्या कालखंडामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. कोसळलेल्या आपत्तीत बाधित झालेल्यांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या मनसेत पक्ष प्रवेशाचा ओघ वाढला. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना या पक्षातील दिग्गजांनी मनसेत रीतसर प्रवेश केला.

भारतीय जनता पक्षामध्ये मागील दहा वर्षापासून कार्यरत असलेले भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्ह्यातील सरचिटणीस शंकर बोरगलवार, ग्रामपंचायत सदस्य विवेक निमसटकर, काँग्रेस शाखाध्यक्ष अमर सोलंकी यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

राजूर (कॉलरी) हा परिसर पूर्वी काँग्रेस चा गढ होता. त्याला भाजपाने सुरुंग लावत राजकीय समीकरणेच बदलवून टाकली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तेथे भाजपला घवघवीत यश मिळाले होते. आता असणाऱ्या भाजपच्या बालेकिल्ल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘एन्ट्री’ केल्याने पुढील समीकरणे बदलतील का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राजुर येथील पक्षप्रवेश प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्ष अल्का टेकाम, महाराष्ट्र महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर, जोती मेश्राम, मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, अंनिस सलाट, आजीद शेख, विलन बोदाडकर, संकेत पारखी यांच्यासह राजूर गावातील मनसेचे कार्यकर्ते व विभागातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
वणी: बातमीदार