Home Breaking News रस्ता चिखलाने माखला, शाळेत कसे जायचे..!

रस्ता चिखलाने माखला, शाळेत कसे जायचे..!

843
C1 20240404 14205351

विद्यार्थी हताश, ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा

वणी: तालुक्यातील कळमना या गावात ग्रामपंचायतीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. गावातून शाळेकडे जाणारा दोनशे मीटरचा रस्ता पुर्णतः चिखलाने माखला आहे. चिखल तुडवत जाणारे विद्यार्थी कमालीचे हताश होत असल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

कोरोना कालखंडा मुळे मागील दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. या सत्रापासून पूर्ववत व नियमित शाळा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच बऱ्याच कालावधीनंतर शाळेची घंटा वाजली आहे. शैक्षणिक धडे घेण्यासाठी विद्यार्थी सुद्धा सरसावले आहेत. मात्र मानव निर्मित कृत्याचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.

घनकचरा व्यवस्थापन असो की गावातील विकास कामे पावसाळा लागण्यापूर्वी करण्याचा प्रघात आहे. पावसाळ्यात विकासकामे केल्यास विविध अडचणीचा सामना करावा लागतो त्यासोबतच कामे सुद्धा निकृष्ट होत असल्याचे दिसून येते.

कळमना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला नाल्या करण्यात आल्या. त्यातून निघालेली माती रस्त्यावर टाकण्यात आली. पावसाचा जोर वाढला आणि शाळेत जाणारा रस्ता पुर्णतः चिखलाने बरबटलेल्या स्थितीत आहे. ग्रामपंचायतीने तातडीने या रस्त्यावर मुरूम, चुरी टाकून दुरुस्ती करावी अशी मागणी पालक व शिक्षकवृंदा कडून होत आहे.
वणी: बातमीदार