Home Breaking News चक्क… विकल्या जाताहेत पीओपीच्या ‘गणेशमूर्ती’

चक्क… विकल्या जाताहेत पीओपीच्या ‘गणेशमूर्ती’

132

* स्थानिक मूर्तिकार संतप्त, कारवाईची मागणी

वणी: वणी शहरामध्ये पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये असे शासनाने आदेशीत केले आहे. पालिकेने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक मूर्तिकारांनी केली होती. येथील शासकीय मैदानावर व्यावसायिकांनी पीओपीच्या मूर्ती विक्रीस आणल्याचे निदर्शनास येताच स्थानिक मूर्तिकार संतप्त झाले असून तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

गणेशोत्सवा निमित्ताने “श्री” च्या मूर्तीची विक्री करण्याकरिता बाहेर गावावरून मूर्तिकार शहरात येत असतात. देखण्या व आखीव, रेखीव मुर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिस पासूनच तयार केल्या जातात आणि त्या मूर्त्याना चांगली मागणी असते. मूर्तिकार तसेच गणेशमूर्ती विक्री करणारे व्यावसायिक प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या विकतात. गुरुवारी सायंकाळी येथील शासकीय मैदानावर स्थानिक मूर्तिकारांनी धाव घेत पाहणी केली असता गणेशमूर्ती विक्री करणारे व्यावसायिक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विकताना निदर्शनास आले. यावर त्यांनी आक्षेप घेतला आणि पालिकेला कारवाईची मागणी केली.

पालिका प्रशासनाने प्लास्टर ऑफ पॅरिस व बेकड माती पासून तयार करण्यात आलेल्या मूर्तीची विक्री करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी पथक गठीत केले होते. ते पथक ऐनवेळी कुठे गेले हे कळायला मार्ग नसून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा होणार की नाही याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे.

यावेळी स्थनिक मूर्तिकार सुधाकर बुरडकर, नत्थु डुकरे, गणेश पाठक, सुहास झिलपे, प्रवीण बोरसरे, मनीष बुरडकर यांचेसह अनेकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विक्रेत्यांवर कारवाई ची मागणी केली आहे.