Home क्राईम दणदणीत…अवघ्या दहा महिन्यात 1 कोटींचा मुद्देमाल ‘जप्त’

दणदणीत…अवघ्या दहा महिन्यात 1 कोटींचा मुद्देमाल ‘जप्त’

701

* दारु, जुगार, रेतीचे 163 गुन्हे दाखल..

* शिरपूर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाया

वणी बातमीदार: शिरपूर पोलिसांनी अवघ्या दहा महिन्यात दारु, जुगार, रेतीचे 163 गुन्हे दाखल केले, अत्यंत क्लिष्ट गुन्ह्याचा तपास काही तासात लावला, लपूनछपून चालणाऱ्या कोंबड बाजारावर मजुरांचा वेशात हल्ला चढवला हे सर्वश्रुत आहे. सोबतच दहा महिन्यातील दाखल गुन्ह्यात तब्बल 1 कोटी 10 लाख 75 हजार 319 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आपल्या कार्यप्रणालीची चुणूक दाखवून दिली.

कोरोना महामारीत टाळेबंदीच्या कालखंडात शिरपूर पोलीस स्टेशनचा प्रभार सांभाळताच ठाणेदार सचिन लूले यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत अवैद्य व्यवसायीक व तस्करांच्या मुसक्या अवळण्याची व्यूहरचना आखली. टाळेबंदीचा लाभ उठवण्याकरिता अवैद्य व्यावसायिक चांगलेच सरसावले होते. प्रशासन कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापनात गुंतलेले असल्यामुळे तस्करांनी संधीचे सोने करण्याचा चंग बांधला होता.

लगतच्या जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे दारु तस्करी चरमसीमेवर होती. गोवंश तस्करी शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतून व्हायची, कोंबड बाजाराने उच्छाद मांडलेला होता तर कोळसा तस्करी किंबहुना चोरी खुलेआम होत होती. सचिन लूले यांनी दहा महिन्यांपूर्वी शिरपूर ठाणेदार पदाचा प्रभार घेताच सर्वप्रथम अवैद्यधंद्यावर आळा घालण्यासाठी नियोजन केले. वेळोवेळी दारू तस्करांची धरपकड केली तब्बल 146 गुन्हे दाखल करून 72 लाख 56 हजार 169 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मटका, जुगारावर धाडसत्र अवलंबत 11 गुन्हे नोंद करण्यात आले तर 13 लाख 11 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैद्य रेती वाहतुकीचे  6 गुन्हे दाखल करत 25 लाख 8 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेत कारवाया केल्यात.

शिरपूर पोलिसांच्या सातत्याने होत असलेल्या करावयाचा धसका घेत अवैद्यरित्या व्यवसाय करणाऱ्यांनी लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात आसरा शोधला आहे. तसेच मागील एक वर्षात LCB ची एकही कारवाई झालेली नाही. यावरून अवैद्य धंद्याची तीव्रता कमी झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.