Home वणी परिसर एस. टी. चा संप, प्रवाशी वाहतुकदारांच्या “पथ्यावर”

एस. टी. चा संप, प्रवाशी वाहतुकदारांच्या “पथ्यावर”

244

भरमसाठ दरवाढ, प्रवाश्यांना आर्थिक भुर्दंड
वाहतूक व्यवस्था कोलमडली

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी कामगारांनी ऐन दिवाळीच्या कालावधीत पुकारलेला संप प्रवाशी वाहतुकदारांच्या पथ्यावर पडला असून भरमसाठ दरवाढ केल्याने प्रवाश्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे वाहतूक शाखा हतबल झाली आहे.

न्यायालयानं बंदी आदेश जारी करून व नंतर राज्य सरकारनं मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करूनही संपकरी कामगार मागे हटायला तयार नाहीत. आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच असल्याने प्रवाशांचे होणारे हाल सम्पूष्टात येण्याची सध्या तरी शक्यता नाही.

शहरी तसेच ग्रामीण भागातील बस सेवा पुर्णतः बंद असल्याने खाजगी प्रवाशी वाहतुकदारांची चांगलीच दिवाळी होत आहे. भरमसाठ दरवाढ करण्यात आली आहे. वणी शहरातून ग्रामीण तसेच लगतच्या तालुक्यात जाण्यासाठी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा दर वसूल करण्यात येत आहे.

वणी आगारातून जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या बंद आहेत यामुळे दिवाळीनंतर विशेषतः भाऊबीजेनंतर आपल्या घरी जाणाऱ्या भावा-बहिणींचे मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे.

वणी शहरातून चंद्रपूर ला जाण्यासाठी 150 रुपये तर कोरपना 100 व शिरपूर करिता 50 रुपये प्रवाशांना मोजावे लागत आहे. अन्यत्र प्रवाशी वाहनाने प्रवास करायचा असल्यास अतिरिक्त 2 ते 3 पट रक्कम खर्च करावी लागत असल्याने प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
वणी: बातमीदार