Home वणी परिसर मानवाने निसर्ग नियमातच राहायला हवे – विवेक पोलशेट्टीवार

मानवाने निसर्ग नियमातच राहायला हवे – विवेक पोलशेट्टीवार

422
C1 20240404 14205351

वैज्ञानिक विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाचा अनिर्बंध वापर करीत आहोत. त्यामुळे जागतिक पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होत आहे. लक्षावधी वर्षांपूर्वी बर्फामध्ये बंदिस्त झालेले जिवाणू विषाणू जर या ग्लोबल वार्मिंग पुन्हा कार्यरत झाले तर त्यांचे नियंत्रण आपल्याला अशक्य होईल. आज आपण निर्माण करत असलेला कार्बण आणि प्लॅस्टिक या जगात समोरील सगळ्यात मोठ्या समस्या असून आता आपण कितीही झाडे लावली तरी कार्बणची समस्या आपल्या हाताबाहेर गेली आहे .

यासाठी कृत्रिम झाडांसारख्या गोष्टींवर संशोधन सुरू असून, आगामी काळात नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला या समस्यांचे निराकरण करणे संभव आहे. त्या दृष्टीने अधिकाधिक संशोधन व्हायला हवे. ” असे मत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च चे शास्त्रज्ञ डॉ. विवेक पोलशेट्टीवार यांनी व्यक्त केले.लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे आयोजित कम्युन या माजी विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधणाऱ्या कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी यशस्वी जीवनातील आदर्श आपल्या कृतीने सप्रमाण सिद्ध करणाऱ्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची प्रेरणा सध्याच्या विद्यार्थ्यांना लाभावी हा उपक्रमाचा उद्देश विशाल केला.आपल्या कार्याने तब्बल 29 पानांचा बायोडेटा तयार झालेल्या प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ.परेश पटेल यांनी करून दिला.आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि तरीही रोचक संवादामध्ये डॉ.पोलशेट्टीवार यांनी नॅनो टेक्नॉलॉजी, त्या क्षेत्रात होत असलेले संशोधन, त्याची आवश्यकता आणि उपयुक्तता, मानवी जीवनातील विविध क्षेत्रात याचा होणारा उपयोग अशा विविध मुद्द्यांना स्पष्ट केले.

वणी तालुक्यातील मंगली या छोट्याशा गावातून जिल्हा परिषद शाळेत शिकत, वणी सारख्या तालुक्यातून पदवी प्राप्त करीत आज असंख्य देशात प्रवास आणि संशोधन करणाऱ्या या शास्त्रज्ञाने आपल्या जीवनाचा आलेख देखील विद्यार्थ्यांच्या समोर आदर्श रूपात प्रस्थापित केला.महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक अरविंद कारखानीस यांनी असे विद्यार्थी मिळणे महाविद्यालयाचे भाग्य आहे हे विशेषत्वाने अधोरेखित केले.

अध्यक्षस्थानी असणाऱ्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनंदा आस्वले यांनी वक्त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी जागृती देत गांभीर्य आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम त्यांच्या ठिकाणी कसा होता? हे विद्यार्थ्यां समोर स्पष्ट केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजित अणे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. अजय राजूरकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.गुलशन कुथे, महादेव भुजाडे तथा पंकज सोनटक्के यांनी विशेष परिश्रम घेतले.
वणी :बातमीदार