Home Breaking News आश्चर्य…. कोलडेपो मुळे प्रदूषण होत नाही…!

आश्चर्य…. कोलडेपो मुळे प्रदूषण होत नाही…!

277

प्रदूषण नियंत्रण मंडळाची चुप्पी

वणी शहरातील रेल्वे सायडिंग, कोलडेपो आणि कोळसा वाहतूकदार धूलिकण व वायू प्रदूषणाकरिता सर्वस्वी जबाबदार असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र आश्चर्य… कोलडेपो धारक म्हणतात कोलडेपो मुळे प्रदूषण होत नाही. त्याप्रमाणेच प्रदूषण नियंत्रण मंडळाची चुप्पी आणि निरी चा अहवाल प्रशासनाने तपासणे गरजेचे झाले आहे.

वणी यवतमाळ रस्त्याच्या कडेला असलेल्या कोळसा डेपांमुळे फार मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट होते. कोळसा डेपोमध्ये कोळसा हाताळणी, साठवणुक व वाहतुकीमुळे धुळ उत्सर्जित होऊन वायु प्रदुषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अवजड वाहनातून नियमबाह्य पद्धतीने होणारी कोळशाची वाहतूक. वाहनातून रस्त्यावर पडणारे कोळशाचे ढेले आणि त्यावरूनच धावणारी वाहने यामुळे धुळीचा मोठया प्रमाणात या भागात उपद्रव असून त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याची शक्यता शत प्रतिशत आहे.

तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी यांनी सार्वजनिक उपद्रव प्रतिबंध कायदा, 1973 चे कलम 133 अन्वये कोळसा डेपो हटविण्याबाबत कोळसा डेपोधारकांना दिनांक 07 मार्च 2009 अन्वये आदेश बजाविण्यात आलेला होता. हा आदेश 29 डिसेंबर 2009 ला न्यायालयाने खारीज केला होता.

तत्कालीन उपविभागीय अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 133 नुसार प्राप्त अधिकारान्वये कलम 138 अन्वये आदेश पारित केला. त्यानंतर 22 ऑक्टोंबर 2012 ला कलम 141 अन्वये आदेश पारित केल्याने कोळसा डेपो धारकांचे धाबे दणाणले होते. अंतिम आदेश कलम 143 पारित करण्यापूर्वीच वऱ्हाडे यांची बदली झाल्याने संपूर्ण प्रक्रियाच बारगळली.

प्रदुषणाची समस्या सोडविण्यासाठी कोल डेपो मुख्य रस्त्यापासुन 5 कि.मी. दुरवर हटविणे गरजेचे आहे. या करिता चंद्रपूरच्या धर्तीवर उप विभागीय अधिकारी यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. तत्कालीन उप विभागीय अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी धाडसी पाऊल उचलले होते मात्र त्यानंतरच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने कोळसा डेपोच्या स्थानांतराचा मुद्दा बासनात गुंडाळला गेला आहे.
वणी: सुनील पाटील