Home Breaking News वीज पडून तीन महिला जखमी, मेघगर्जना आणि धुव्वाधार पाऊस

वीज पडून तीन महिला जखमी, मेघगर्जना आणि धुव्वाधार पाऊस

704
C1 20240404 14205351

चिखलगाव शिवारातील घटना
काहीवेळ जनजीवन विस्कळीत

रोखठोक : परतीच्या पावसाने अद्याप उसंत घेतली नाही. दररोज कोसळधार बघायला मिळत आहे. सोमवार दि. 17 ऑक्टोबर ला दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान विजेचा कडकडाट आणि धुव्वाधार पाऊस बरसला. त्यातच चिखलगाव शिवारात वीज पडून तीन महिलांना जबर धक्का बसला. जखमी महिलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मीरा बोढाले, प्रतिभा बोढाले व लीना वाढई असे जखमी महिलांची नावे आहेत. त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. घटनेच्या दिवशी चिखलगाव शेत शिवारात संजय बोढाले यांच्या शेतात शेतकाम करत असताना ही घटना सोमवारी दुपारी घडली.

अचानक अवतरलेल्या पावसाने शहरात जनजीवन विस्कळीत झाले तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. तालुक्यात सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे. सण उत्सवाचे दिवस असल्याने शेतकऱ्यांची पीक घरी नेण्यासाठी लगबग सुरू आहे.

परतीच्या पाऊसाने मागील काही दिवसांत चांगलाच गोंधळ घातला आहे. विजेच्या कडकडाटाने दणाणून टाकले तर पावसाने अक्षरशः तांडव केले. यामुळे शहरातील बाजारहाट करण्यासाठी आलेल्यांची तारांबळ उडाली. त्यातच वीज पडण्याचा घटनेत सुद्धा वाढ झाल्याने शेतकरी, शेतमजूर चिंतातुर झाले आहेत.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. यावर्षी अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचा पिच्छाच सोडला नाही. झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्पादन क्षमता घटली आहे. तरी सुद्धा जे मिळेल त्यात समाधान मानणारा बळीराजा आर्थिकदृष्ट्या खंगत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.
वणी: बातमीदार