Home वणी परिसर धक्कादायक….उमरीपोड चा पूल बेपत्ता, दोनदा झालेले भूमिपूजन ठरले ‘वांझोटे’

धक्कादायक….उमरीपोड चा पूल बेपत्ता, दोनदा झालेले भूमिपूजन ठरले ‘वांझोटे’

489

* तीन पुरस्कार प्राप्त शिवनाळा गावाची व्यथा 

बोटोणी( मारेगाव): राहुल आत्राम- आदिवासी बहुल पेसा अंतर्गत येत असलेल्या शिवनाळा गावाला एक-दोन नव्हे तर तब्बल तीन पुरस्कार प्राप्त आहे. पेसा मुळेच शिवनाळा गावाला लाखो रुपयांचा निधी प्राप्त होतो. मात्र येथील उमरीपोड ला जाणाऱ्या नाल्यालगत पुलाचे भूमिपूजन दोनदा करण्यात आले. मात्र पुलाचे बांधकाम झाले नसल्याने पूल बेपत्ता झाल्याची प्रचिती येत आहे. पुलासाठी दोनदा झालेले भूमिपूजन वांझोटे ठरत आहे. ही व्यथा आहे शिवनाळा ग्रामपंचायतची..!

मारेगाव तालुक्यातील पेसा अंतर्गत शिवनाळा ग्रामपंचायत आहे. या गावालगत उमरीपोड, तलावपोड, तेलाईपोड, पांडववीहिर आदिवासी कोलाम बहुल समाजाचे पोड वसलेले आहे. मात्र विविध शासकीय योजनेचा येथे बोजवारा उडाला आहे. कृषी संजीवनी प्रकल्प(पोकरा) योजनेच्या लाभापासूनही येथील जनता कोसो दूर आहे. रस्त्यावर असलेल्या चिखलाचे साम्राज्य येथील नागरिकांच्या नशिबी चिकटलेले आहे. शबरी आवास, इंदिरा आवास योजना व कोलाम घरकलाचे प्रश्न अधांतरी आहे. रस्त्याच्या दुतर्फा केरकचऱ्याने सरपटणारे प्राणी घरात शिरत आहे.

तेलाईपोड येथील कोलाम जमातीचे प्रेरणास्थान आणि श्रद्धांस्थान असलेली चावडी अजूनही मंजूर झालेली नाही. शिवनाळा ते तेलाईपोड हा 38 लाखाचा डांबरीकरण रस्ता केवळ खडीकरण करून आवासून उभा आहे. यासह विविध समस्यानी ग्रासलेल्या पुरस्कार प्राप्त शिवनाळा ग्रामपंचायतची व्यथा कायम आहे. दरम्यान गेल्या सात वर्षापूर्वी सार्वत्रिक निवडणूका डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन “जिल्हा परिषद सदस्य व माजी आमदार” यांनी वेगवेगळ्या वर्षाला उमरीपोड च्या नाल्यावरील पूल बांधकामाचे भूमिपूजन लगबगीने उरकविले होते.

जिल्हा परिषद मधून मंजूर झालेल्या 19 लाख रुपयांच्या पुलाचे भूमिपूजन सात वर्ष उलटूनही वांझोटे ठरत आहे. परिणामी पुलाचे बांधकाम करण्याचा मुहूर्त अजूनही सापडला नसल्याने हा पूल बेपत्ता झाला आहे. येथील नाल्यातून येजा करण्यास नागरिकांना सर्कस करावी लागत असल्याने शासन प्रशासन प्रती प्रचंड असंतोष खदखदत आहे. लोकप्रतिनिधी मात्र ‘कोमात’गेल्याचा प्रत्यय येत आहे. विकास कामाचा बोजवारा उडविणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या “पंगु” भूमिकेने पुरस्कार प्राप्त शिवनाळा गावाचे ‘शुक्लकाष्ठ’ अजूनही कायम आहे.