Home Breaking News त्या….’ठगबाज’ व्यापाऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी

त्या….’ठगबाज’ व्यापाऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी

777

शेतकऱ्यांना कोट्यवधीचा गंडा
तीन महिन्यापासून होता फरार
पोलिसांनी केली होती अटक

वणी: धीरज सुराणा या व्यापाऱ्याने तब्बल 147 शेतकऱ्यांचे APMC यार्डात 1 हजार 935 क्विंटल सोयाबीन खरेदी केले होते. त्याची एक दमडी सुद्धा शेतकऱ्यांना न देता कोट्यवधी रुपयांचा घपला करणाऱ्या व पसार झालेल्या ठगबाजाला तीन महिन्यानंतर ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

धीरज सुराणा असे त्या ठगबाजाचे नाव आहे. त्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विकत घेवून शेतकऱ्यांनाच करोडोचा गंडा घातला होता. तीन महिन्यापासून फरार आरोपीला सोमवारी वणी पोलिसांनी सोमवारी अटक केली.

इनाम योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाचा चुकारा, बाजार समितीची बाजार फी, शासनाची सुपरव्हिजन कॉस्ट फी आणि अडत्याची अडत असा एकूण 1 कोटी 15 लाख 26 हजार 46 रुयाची फसवणूक केल्याची तक्रार APMC चे सचिव अशोक झाडे यांनी पोलिसात केली होती.

पोलिसांनी शेतकरी, अडते यांचा जाब-जबाब नोंदवून फसवणुकीचा गुन्हा नोंद केला. बाजार समिती व्यतिरिक्त परिसरातील अन्य शेतकऱ्यांची तर फसवणूक झाली नाही ना हे तपासणे सुद्धा गरजेचे झाले असून या बाबत पोलीस कोठडी नंतरच खरा उलगडा होणार आहे.

असमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना लुटणाऱ्या टोळ्या खरंच सक्रिय झाल्या आहेत. बनावट बियाणे, बोगस खते, आणि सुंदर स्वप्न दाखवून गंडवणाऱ्यांचे खूप पीक आले आहे. त्यातच राब-राब राबून काळ्यामातीतून भावी स्वप्न बघणाऱ्यांच्या स्वप्नालाच तडा देणाऱ्याना कठोर शासन व्हावे हीच अपेक्षा ते पीडित शेतकरी करताहेत.
वणी: बातमीदार