विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला, नागरिक भयभीत
वणी बातमीदार: तालुक्यातील साखरा-दरा येथील आदर्श शाळेच्या प्रांगणात वाघाच्या पायाचे ठसे आढळले. ही भयभीत करणारी बाब गुरुवार दि. 29 जुलै ला दुपारी शिक्षकांच्या निदर्शनास आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. परिसरात वाघाच्या मुक्तसंचारामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला तर नागरिक भयभीत झाले आहे.
साखरा-दरा येथील आदर्श शाळेच्या प्रांगणात दुपारी वाघाच्या पायाचे ठसे आढळताच शिक्षकांनी याबाबत ग्रामस्थांना सूचित केले. त्याप्रमाणेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या गंभीर बाबीची कल्पना देण्यात आली. 24 तास लोटल्यावरही वनविभागाच्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देण्याचे सौजन्य दाखवले नाही.
वणी उपविभागात सातत्याने वाघांचा मुक्तसंचार सुरू असतो. झरीजामनी तालुक्यातील पिवरडोल या गावातील अविनाश पवन लेनगुरे या 17 वर्षीय तरुणाला लक्ष केले होते. अशा घटना या परिसरात नेहमीच घडताना दिसत आहे. अनेक व्यक्तींना जायबंदी तर जनावरांचा फडशा वाघाने पाडला आहे. साखरा-दरा या गावात चक्क.. शाळेच्या प्रांगणात वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने मुक्तसंचार करणाऱ्या त्या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.