Home क्राईम अवैधरित्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

अवैधरित्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

438

*मुकुटबन पोलीसांची कार्यवाही

*पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

घोन्सा बातमीदार: प्रविण नैताम- साखरा-दरा येथील नाल्यामधून अवैधरित्या रेती उत्खनन करुन वाहतूक करत असलेल्या ट्रॅक्टरवर 10 ऑगस्ट ला  मुकुटबन पोलीसांनी कारवाई केली. यांमध्ये जवळपास 5 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमालासह ट्रॅक्टर चालकांला ताब्यात घेण्यात आले आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्याने परिसरातील अनेक लहान मोठ्या नद्या, नाल्यातून पुर गेले, त्यामुळे  नदी व नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रेती साठा आहे. याचाच फायदा घेत अनेक रेती तस्करांनी डोके वर काढले आहे. रात्री बे रात्री संधी साधून अवैधरित्या रेतीवर उपसा सुरू आहे.

मुकुटबन पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, साखरा- दरा लगतच्या नाल्यातून रेतीचे उत्खनन करून चोरी केल्या जात आहे. पोलीसांनी साखरा -दरा येथील शाळेजवळ सापळा रचून ट्रॅक्टरची तपासणी केली असता ट्रॅक्टर ट्राली मध्ये रेती आढळून आली. यावेळी ट्रॅक्टर चालकांला रेती वाहतुकीचा परवण्याची  विचारणा केली असता कसल्याही प्रकारचे कागदपत्रे, परवाना मिळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी सदर ट्रॅक्टर व चालक प्रविण आदे यांना ताब्यात घेऊन  ट्रॅक्टर व ट्राली क्रं.एम.एच.29 ए.के.5099 वाहन जप्त केले. अवैधरित्या रेती एक ब्रास किंमत सहा हजार रुपये, महिंद्रा ट्रॅक्टर किंमत पाच लाख रुपये असा एकूण पाच लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा नोंद  करण्यात आला. सदर कारवाई ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार सकवान, प्रविण ताडकोकुलवार, जितेश पानघाटे, मंगेश सलामे यांनी केली.