राजू उंबरकर ,गजानन किन्हेकार यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलनाला प्रारंभ
मारेगाव बातमीदार:दीपक डोहणे– नागरिकांची मूलभूत गरज असलेल्या रस्ते,नाली गाव विकासाचे शहरात पूर्णतः भ्रष्ठाचाराचे कुरण बनले असून यास जबाबदार असलेल्या प्रशासकीय अधिकारी ,कर्मचारी तथा कंत्राटदार यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबित करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी घंटानाद आंदोलन नगरपंचायत कार्यालय समोर सुरू करण्यात आले. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर व स्वराज्य युवा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकर यांनी संयुक्तरित्या फीत कापून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करीत आंदोलनाला सुरुवात झाली.
मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे बांधकाम नियमाला तिलांजली देत काम करण्यात आले.रस्त्याच्या वास्तव व इष्टीमेटला बगल देत या रस्त्याच्या कामात लाखो रुपयांचा मलिंदा लाटण्याचा गोरखधंदा बिनधास्तपणे सुरू आहे.या बोगस कामाचे येथील मुख्याधिकारी आणि अभियंता भ्रष्टाचाराचे धनी बनत ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ म्हणत मूग गिळत आहे.
दरम्यान शहराच्या अनेक प्रभागात थातूरमातूर कामे उरकविण्याचा सपाटा सुरू करण्यात आला. प्रशासनाच्या स्वप्नातील ठेकेदारास सर्वस्व अर्पण करीत येथील प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहराची पूरती वाट लावण्याचे षडयंत्र चालविले असल्याचा नागरिकांककडून आरोप होत आहे.अनेक ठिकाणचे रस्ते अवघ्या दिवसात सिमेंट , गिट्टी उखडून खड्डे पडले आहे.यावर अधिकारी चुप्पी साधून आहे.अनेक ठिकाणच्या कामाची पायमल्ली करीत शहराच्या विकासाचे वाटोळे बिनधास्त पणे सुरू असतांना या बहुचर्चित मुख्याधिकारी व अभियंता यांच्या अधिनस्थ असलेल्या कामाची क्वॉलीटी कंट्रोल बोर्डा कडून सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करीत निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी येथील गजानन चंदनखेडे , शब्बीर पठाण , मारोती देवाळकर , विनोद बदकी , बंडू मत्ते , दिनेश सरवर , राजू बदकी , मनोज पेंदोर , यांचे सह नागरिकांनी घंटानाद आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे.सदर आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वराज्य शेतकरी युवा संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
