* बोटोणी येथील प्रकार
बोटोणी: राहुल आत्राम- बोटोणी उपकेंद्राचे साहित्य जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीत हलविल्याने हे साहित्य कुणाच्या आदेशाने हलविले याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.
मागील पंधरा वर्षांपासून येथील इमारतीत उपकेंद्र आहे. मात्र उपकेंद्रात एकाने अतिक्रमण करीत आरोग्य विभागाचे साहित्य थेट जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीत हलविले मात्र आरोग्य विभाग कुंभाकर्णी झोपेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान बोटोणी येथील उपकेंद्रच गायब झाल्याने येथील जनतेचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शासकीय कामाचे साहित्य स्थलांतरित करण्याचा अधिकार अतिक्रमित व्यक्तीला कुणी दिला हा प्रश्न येथे मात्र अनुत्तरीत आहे. प्रशासनाच्या बोथट कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महादेव सिडाम, पुष्पा परचाके, ताराबाई किनाके, लक्ष्मण टेकाम, सुनीता नगराळे, कैलास भसारकर यांचेसह अनेकांच्या स्वाक्षरीने तक्रार निवेदन वरिष्ठांना देण्यात आले आहे.