* सुदैवानं जीवितहानी टाळली, येनक येथील घटना
* अंगणात वीज पडल्याने विद्युत उपकरणे निकामी
वणी- वणी परिसरात मागील तीन दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस पडत आहे. दि 6 सप्टेंबर ला सायंकाळी येनक येथील शेतकऱ्याच्या अंगणात असलेल्या झाडावर वीज पडली. एका महिन्यात, एकाच ठिकाणी दोन वेळा वीज पडल्याने पारिवारिक मंडळी भयभीत झाली आहे तर विद्युत उपकरणे निकामी झाल्यामुळे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
तालुक्यातील येनक ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या हनुमान नगर येथे सोमवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास आकाशात विजेचे तांडव सुरु होते. पावसासोबतच विजेचा कडकडाट होत होता आणि त्याच वेळी विट्ठल गोरे यांच्या घराच्या अंगणातील कडुलिंबाच्या झाडावर वीज कोसळली. झाडाला चांगलीच क्षती पोहचली तर घरातील विद्युत उपकरणे निकामी झाली आहे.
एकाच महिन्यात गोरे यांच्या घरातील अंगणात दुसऱ्यांदा वीज पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सोमवारी पडलेल्या विजेमुळे लगतच वास्तव्यास असलेल्या मंगल गेडाम यांच्या घराचं छत, देविदास लिक्केवर यांच्या घराची संरक्षक भिंत व संडास बाथरुम चे सुध्दा नुकसान झाले आहे.
विठ्ठल गोरे यांच्या घरापासून अवघ्या 50 फूट अंतरावर ए.सी.सी कंपनीने विद्युत रोहित्र बसविले आहे. कदाचित त्यामुळेच नैसर्गिक वीज निर्मिती खेचल्या जात असावी असा अंदाज ग्रामस्थ वर्तवत आहे. तरी तात्काळ ते विद्युत रोहित्र हटवावे अशी मागणी करण्यात येत आहे.