● निर्गुडा दुथडी भरून वाहताहेत
● नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
● संततधार पावसाने पिके धोक्यात
वणी- मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलाच खेळ मांडलाय. दिवसा- रात्री जेव्हा सवड मिळेल तेव्हा झोडपून काढत आहे. मंगळवारी पहाटे 4 वाजतापासून सलग 5 तास ढगफुटी प्रमाणे संततधार सुरू आहे. निर्गुडा दुथडी भरून वाहताहेत यामुळे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी नदी काठावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
संततधार पावसाने हजेरी लावल्यामुळे सातत्याने वाढत असलेली निर्गुडा नदीची पाणी पातळी लक्षात घेता रंगारीपुरा, सेवानगर, गंगाविहार, वासेकर लेआऊट, दामले फैल, बोढी परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे असे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी आवाहन केले आहे.
मंगळवारी पहाटे पासून ‘ढगफुटी’ प्रमाणे संततधार सुरु आहे. नांदेपरा मार्ग बंद झालेला आहे, नाल्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. रस्त्यावरील नाला दुथडी भरून वाहत आहे. तसेच ब्राम्हणी फाटा परिसरातील बायपास लगतच्या वसाहतीत पाणी शिरले आहे. त्या प्रमाणेच निर्गुडा नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याने नगराध्यक्ष बोर्डे पहाटे पासून शहरातील नदी काठावर असलेल्या “स्लम” भागातील पाहणी करताहेत तसेच धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता प्रशासनासोबत संपर्क साधून आहेत.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी होणार असल्याचे वर्तवण्यात येत होते. खरिपाच्या सुरवातीला समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि काळ्या मातीत स्वप्न पेरले. तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस व सोयाबीनची लागवड करतात परंतू मागील काही दिवसांपासून पावसाचा “हानरट्टा” सुरू असल्याने खरिपातील पिके धोक्यात आली आहे.