Home वणी परिसर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

233

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी

वणी : वणी तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांमध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी झालेली आहे. तब्बल अडीच हजार हेक्टर वरील पिके बाधित झाली असून शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी बुधवार दि. 29 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उप विभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजली आहे. कधी असमानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. सप्टेंबर महिन्यात सलग काही दिवस पावसाने झोडपून काढले आहे. ऐन बहारात असलेली पिके बाधित झाली आहेत. कपाशीचे फुल-पाती गळून पडलीत तर बोन्ड सडायला लागली आहे. अकस्मात आलेल्या गुलाब वादळामुळे नैसर्गिक आपत्तीत भर पडली आहे. शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.

उत्पादन क्षमता घटणार असून ओला दुष्काळाच्या सावटात बळीराजा आहे.हातात आलेला घास हिरावल्या जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याला शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. त्यामुळे वणी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या निवेदनातून केली आहे.

याप्रसंगी वणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉ. महेंद्र लोढा, जयसिंग गोहोकार, सूर्यकांत खाडे, राजाभाऊ बिलोरिया, रामकृष्ण वैद्य, विजया आगबत्तलवार, सविता ठेपाले, मारोती मोवाडे, गजेंद्र काकडे, किशोर ठेंगणे, राजेंद्र जेनेकर, पद्माकर देवाळकर, कमलाकर देवाळकर, सुनील पानघाटे, राजू उपरकर उपस्थित होते.