
● चंद्रपूर पोलीस शहरात दाखल
बॅकेतील एटीएम मध्ये पैसे भरण्याचे काम करणारा युवक रहस्यमय रित्या बेपत्ता झाला होता. तब्बल 8 दिवसानंतर त्याचा मृतदेह एका जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. हत्त्येप्रकरणी एका बार मालकाला अटक करण्यात आली होती परंतू खऱ्या अर्थाने या हत्त्येचा उलगडा व्हावा याकरिता चंद्रपूरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी गुरुवार दि. 7 ऑक्टोबरला वणीत दाखल झाले होते.
शहरातील विठ्ठलवाडी प्रसारात वास्तव्यास असलेला 35 वर्षीय युवक संतोष वाटेकर ईपीएस लाॅजी कॅश सोलुशन प्रा. लिमिटेड नागपूर या कंपनीत एटीएम मध्ये रक्कम भरण्याचे काम करीत होता. दि. 20 फेब्रुवारी 2020 ला वणी येथील स्टेट बॅकेच्या मुख्य शाखेतुन त्याने 28 लाख रुपये नायगांव व मारेगांव येथील एटीएम मध्ये भरण्यास घेवून गेला होता.

संतोष वाटेकर हा तरुण त्या दिवसापासून बेपत्ता झाला होता. दि.29 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर जवळील जंगलात कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खळबळ माजली होती. त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने चंद्रपूर व यवतमाळ पोलिसांनी संयुक्तरित्या तपास सुरू केला. या तपासात मृतक संतोष च्या संपर्कात असलेल्या अनेकांची चौकशी करण्यात आली होती.

तब्बल 4 महिन्यानंतर येथील एका बार व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली होती. अटकेतील व्यक्तीची जामिनावर सुटका देखील झाली आहे मात्र मृतक संतोष ची दुचाकी, मोबाईल व 28 लाख रुपयांची रोकड अद्याप पोलिसांच्या हाती लागली नाही. सबळ पुरावा मिळत नसल्याने पोलिसांनी पुन्हा नव्याने या हत्त्येचा तपास सुरू करून वणी शहरावर लक्ष केंद्रित केले आहे.
गुरुवारी चंद्रपूर LCB प्रमुख बाळासाहेब खाडे, हे आपल्या पथकासह वणीत दाखल झाले होते. त्यांनी शहरात काही ठिकाणी चौकशी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानंतर जिल्हा पोलिस उपअधीक्षक, चंद्रपूर यांचेसह उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी येथील विश्रामगृहात काहींची चौकशी केल्याचे विश्वसनिय वृत्त “रोखठोक” च्या हाती लागली आहे. या प्रकरणात हत्त्येचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
वणी: बातमीदार