● महामार्गाच्या नुतनीकरणा करिता ठिय्या
चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावरील खड्डयामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या महत्वपूर्ण महामार्गाची दुरुस्ती साठी आता मनसेने पुढाकार घेत चक्क महामार्गावर उपोषण सुरू केले असून हे उपोषण आक्रमकते कडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आबई फाटा ते ढाकोरी बोरी मार्गाची अवस्था बिकट झाली आहे. नागरिकांना या रस्त्याने ये-जा करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली होती मात्र यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गून गोहोकार यांच्यासह कार्यकर्त्यांनी ढाकोरी गावा जवळ दि 26 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
● अधिकाऱ्यांच्या खुर्ची खाली फोडणार फटाके ●
वारंवार मागणी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहे. यावर तोडगा काढला नाही तर संबंधित अधिकाऱ्याच्या खुर्ची खाली फटाके फोडून “फोड रे फटाका” हे अनोखे आंदोलन करण्यात येणार असल्याचा खणखणीत इशारा मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला आहे.
उपोषणाची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता तुषार परळीकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून उपोषण सोडावे अशी विनंती उपोषणकर्त्याना केली. मात्र समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनात फाल्गून गोहोकार, प्रवीण डाहुले, मंगेश दुरटकर, प्रकाश कुंडेकर, निखिल मालेकर, सारंग येडे, अरविंद राजूरकर, मनोज ठावरी, सूरज डोहे हे सहभागी झाले आहेत.
वणी: बातमीदार