Home Breaking News वणी आगारातील 12 कर्मचारी निलंबित

वणी आगारातील 12 कर्मचारी निलंबित

1647

कर्मचाऱ्यात खळबळ

मागील काही दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.वणी आगारातील 12 चालक व वाहक पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

‘जिथे रस्ता, तिथे एसटी’ अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. कर्मचारी संपावर ठाम असल्यानं  एसटी रस्त्यावर येण्याची शक्यता नाही.एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्यासाठी सरकारनं त्रिसदस्यीय समितीही स्थापन केली आहे.

न्यायालयात याबाबत सरकारनं माहिती दिल्यानंतरही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे आजही राज्यभरात एसटी वाहतूक ठप्प झाली आहे.राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले. प्रवाशांना वेठीस धरू नये असेही त्यांनी म्हटले होते. संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले होते.

अखेर दि 10 नोव्हेंबरला वणी आगारातील मिलींद गायकवाड, सतीश कांबळे,संतोष लाटकर,अविनाश बोबडे,प्रमोद जळेकर, अनिल किनाके,धर्मा धोत्रे,वासुदेव आत्राम,प्रफुल्ल बांबल, अंकुश पाझरे, अरुण नैताम,विलास जाधव अश्या 12 चालक व वाहक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबनाचे आदेश विभागीय वाहतूक अधीक्षक यवतमाळ यांनी  काढले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

वणी :बातमीदार