Home Breaking News शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ‘शिवचरणी लीन’

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ‘शिवचरणी लीन’

266

पुण्यात त्यांनी घेतला अखेरचा श्वास

इतिहासलेखक बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावली होती. दीनानाथ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांचेवर उपचार सुरु असताना त्यांनी पहाटे 5 वाजता अखेरचा श्वास घेतला असून ते शिवचरणी लीन झालेत.

बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिया झाला होता यामुळे ते गेल्या आठवड्याभरापासून दीनानाथ रुग्णालयामध्ये दाखल होते. रविवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांनी 4 महिन्यांपूर्वी वयाच्या शंभरीत पदार्पण केलं होतं.

महाराष्ट्रसह देशभरात इतिहास संशोधक, ‘शिवशाहीर’ आणि लेखक म्हणून ते ओळखले जातात. त्याचं जन्म नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुण्याजवळच्या सासवड इथे झाला.

शिवशाहीर म्हणून प्रसिद्ध बाबासाहेब पुरंदरे यांनी पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळात इतिहास संशोधक म्हणून काम सुरू केलं. 2015 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजारहून अधिक व्याख्यानं दिली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य आणि महाराष्ट्रातील गडकिल्ले हा बाबासाहेबांच्या अभ्यासाचा विषय आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना गेली अनेक दशके महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही शिवचरित्र नेण्याचे श्रेय त्यांना दिलं जातं.

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत: ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललिक कादंबरी लेखन, नाट्य लेखन केलं आहे.’राजा शिवछत्रपती’ ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती मानली जाते. तसंच जाणता राजा या नाटकाने अफाट लोकप्रियता मिळवली.

2015 मध्ये त्यांना महाराष्ट्रभूषण तर 2019 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा या नाटकाचे 1200 हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक 5 भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव पुणे येथील पार्वती परिसरातील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांचेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वणी: बातमीदार