Home Breaking News आज वणीत नक्षल कमांडर वर ‘अंत्यसंस्कार’

आज वणीत नक्षल कमांडर वर ‘अंत्यसंस्कार’

3349

चकमकीत मिलिंद तेलतुंबडे ठार
मृतदेह ताब्यात घेण्याकरिता नातेवाईक रवाना

महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर शनिवारी माओवादी व पोलिसात झालेल्या चकमकीत नक्षल चळवळीचे आधारस्तंभ असलेल्यांचा खात्मा करण्यात आला. यात नक्षल कमांडर मिलिंद तेलतुंबडे यांचा समावेश असून त्यांचेवर वणी लगत असलेल्या लालगुडा परिसरात सोमवार दि. 15 नोव्हेंबर ला दुपारी नातेवाईकांच्या समक्ष अंत्यसंस्कार होणार आहे.

माओवादी छत्तीसगडमधून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर माओवादी विरोधी पथकाने या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले. याच दरम्यान जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. शनिवारी सकाळी ग्यारापत्तीच्या जंगलात पोलीस आणि माओवादी यांच्यात चकमक सुरू झाली होती. यावेळी तब्बल 26 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

या कारवाईमध्ये मिलिंद तेलतुंबडेसह जोगन्ना, विजय रेड्डी, संदीप दीपकराम यांचा मृत्यू झाला आहे. हे चौघेही नक्षल चळवळीचे आधारस्तंभ होते. मिलिंद तेलतुंबडे हे वणी तालुक्यातील राजूर( इजारा) येथील निवासी होते मात्र ते मागील 25 वर्षांपासून नक्षल चळवळीत सामील झाल्यामुळे गावी आलेच नाहीत.

मिलिंद तेलतुंबडे यांच्या पत्नी प्राध्यापक असून त्यांचे वास्तव्य नागपूरला आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करावा या विवंचनेत त्या असताना वणीतील नातेवाईकांनी पुढाकार घेत वणी लगत असलेल्या लालगुडा परिसरात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

लालगुडा येथे त्यांचेवर सोमवारी दुपारी नातेवाईकांच्या उपस्थितीत विधिवत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आज सकाळी मिलिंद तेलतुंबडे यांचे नातेवाईक गडचिरोली ला रवाना झाले आहेत. कागदोपत्री पूर्तता करून पोलीस प्रशासन तेलतुंबडे यांचा मृतदेह नातेवाईकांना सोपवणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.
वणी: बातमीदार