ज्या प्रमाणे प्रभू रामचंद्रांनी उपलब्ध मर्यादित संसाधनांचा वापर करून विजय मिळविला. त्याचप्रमाणे न्यायालयाला उपलब्ध संसाधनांचा वापर करून चांगल्यात चांगले काम करून कायद्याला अपेक्षित न्याय देण्याचा प्रयत्न न्यायालय करीत असते असे प्रतिपादन येथील दिवाणी मुख्य न्यायाधीश कैलास चाफले यांनी केले.
ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाच्या समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते.
येथील महसूल भवन मध्ये तालुका विधी सेवा समिती, अधिवक्ता संघ व पंचायत समिती वणी यांच्या संयुक्त विद्यमाने वणी तालुक्यात राबविण्यात आलेल्या जागृती विषयक कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्याय. कैलास चाफले हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सह दिवाणी न्यायाधीश सुधीर बोमिडवार, न्यायाधीश प्रकाश बछले हे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून तालुका विधी सेवा समितीचे सचिव गटविकास अधिकारी राजेश गायनर, नायब तहसीलदार आर. बी. खिरेकार, वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस, विशेष सरकारी वकील पी. एम. कन्नलवार उपस्थित होते.
त्यानंतर पुढे बोलतांना न्या. चाफले म्हणाले की, कोर्टाची पायरी चढू नये असं सर्वसामान्य पणे म्हटल्या जाते ते खर आहे. आपल्या देशातील कायद्यानुसार प्रत्येक नागरिकांना कायद्याची पूर्ण माहिती आहे. अस गृहीत धरल्या जाते. पण जिथे अनेक वर्षे कायद्याचा अभ्यास केलेल्या वकिलांना व न्यायाधीशानाही प्रसंगी कायदा समजून घेण्यासाठी पुस्तके वाचावी लागतात. तर सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त 2 ऑक्टोबर गांधी जयंती पासून 14 नोव्हेंबर पं. नेहरू यांच्या जयंती पर्यंत कायदेविषयक जनजागृती उपक्रमांचे नियोजन केले होते. त्या अनुषंगाने गावोगावी जनजागृती शिबीर, माहिती पत्रकाद्वारे, पथनाट्या द्वारे जनजागृती करण्यात आली व वर्ग 5 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन गटा मध्ये कायदेविषयक जन जागृतीचा संदर्भ घेऊन निबंध स्पर्धा घेण्यात आली. असे सांगून न्यायालयातील विविध प्रकारणाविषयी माहिती दिली.
त्यानंतर आर. बी. खिरेकार यांनी महसूल विभागातर्फे चालविल्या जात असलेल्या लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. पी. एम. कन्नरवार यांनी कायदेविषयक जनजागृती केलेल्या पथनाट्य कलावंताचे कौतुक केले. न्यायमूर्ती बोमिडवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेविषयक माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
या प्रसंगी बेटी बचाओ, बेटी पढाव या विषयावर आधारित पथनाट्य सादर करणाऱ्या आशा सेविकांचा व नागरिकांचे मूलभूत अधिकार या विषयावर लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्य कलावंतांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यासोबत या अनुषंगाने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील तीन गटातील 9 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी राजेश गायनर यांनी केले. संचालन डी. एम. खोके व शैलेश लिखार यांनी केले. आभार ऍड. ठाकूर यांनी मानले.
वणी:बातमीदार