● अमानुषतेने गाठली परिसीमा
● तब्बल 6 दिवस मृतदेह घरातील कोठीत
आर्णी : तालुक्यातील कुऱ्हा डूमणी येथे मानवी समाजाला काळिमा फासणारी घटना घडली. अमानुषतेने परिसीमा गाठत अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्या ‘मानवी’ ची गळा आवळून हत्या केली आणि तब्बल 6 दिवस मृतदेह स्वयंपाक घरातील धान्य ठेवण्याच्या कोठीत लपवल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.
मानवी अविनाश चोले (3)रा. कुऱ्हा डूमणी ता. आर्णी ही चिमुकली घराच्या समोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली होती. घरच्यांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला परंतू ती आढळली नाही. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार वडील अविनाश यांनी 20 डिसेंबर ला दुपारी आर्णी पोलिसात केली होती.
घटनेचे गांभीर्य बघता पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी तपास अधिकारी यांना मार्गदर्शन करीत सूचना दिल्या. आर्णी पोलीस स्टेशन चे पथक सोबतच LCB चे दोन व सायबर सेल अशा चार पथकाच्या मदतीने समांतर तपास यंत्रणा राबवली.
पोलीसांनी संपूर्ण गाव शेत शिवार वनविभागाच्या मदतीने जंगल परिसर मुलीच्या शोधामध्ये पिजुन काढले. घटनास्थळावर कोणताही भौतिक पुरावा उपल्बध नसतांना 100 च्यावर गोपनीय बातमीदार नेमुन तांत्रिक बाबीचे संकलन करुन तपास करण्यात आला, अनेक संशयितांची कसून चौकशी करण्यात आली, तरी सुद्धा अपहृत ‘मानवी’ चा छडा लागत नव्हता.
रविवारी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांशी सवांद साधून मदतीचे आवाहन केले. गावातील पोलिसांचा वाढता राबता बघून घाबरलेल्या आरोपीने स्वतःच्या बचावाकरीता अपहृत मुलीचा मृतदेह गावातीलच एका घराच्या मागील बाजुस फेकून दिला.
अपहृत मुलीचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच स्वतः पोलीस अधिक्षक हे तात्काळ घटनास्थळी पुन्हा दाखल झाले व त्वरीत श्वान पथक, न्यायवैज्ञानिक पथक तसेच वैद्यकिय पथकास पाचारण करण्यात आले. या सर्व पथकास हाताशी घेउन अज्ञात आरोपीची शोध मोहिम राबवली असता श्वान पथकाने मोलाचे कार्य करीत थेट आरोपीचे घर गाठले.
दिपाली ऊर्फ पुष्पा गोपाल चोले असे निर्दयी महिलेचे नाव असून ती मृतक मानवी ची नातेवाईक आहे. घटनेच्या दिवशी खेळत असलेल्या चिमुकलीला त्याच दिवशी ठार केले व तिचा मृतदेह हा तिच्या स्वयंपाक घरातील गव्हाच्या छोटया कोठी मध्ये सहा दिवस लपवून ठेवला. गावात पोलिसांचा वाढता वावर असल्याने ती घाबरली आणि मृतदेह घराच्या मागे फेकला आणि हत्त्येचे बिंग फुटले.
वणी: बातमीदार