● नियमांचे पालन करा, प्रशासन सज्ज
वणी: कोविड त्रिसूत्रीचे पालन करणे नागरिक पूर्णतः विसरले आहेत. त्यातच दबा धरून बसलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. तब्बल एक महिन्यानंतर तालुक्यातील दोन महिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Positive) निघाल्याने प्रशासन सज्ज झाले असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरताच नागरिक बिनधास्त झाले होते. कोविड त्रिसूत्रीचे पालन करणे पूर्णतः विसरल्याचे दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे अशा सूचना शासनस्तरावरुन सातत्याने देण्यात येत असताना नागरिक मात्र बेजबाबदार पद्धतीने वागत असल्याचे दिसत आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मोठया प्रमाणात वाताहत झाली. आर्थिक, शारीरिक व मानसिक आघात सहन करावा लागला तर अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. शासनाने आखून दिलेल्या कोविड त्रिसूत्रीचे पालन करण्याची गरज साध्यस्थितीत आहे.
तालुक्यातील सुंदरनगर येथील 21 वर्षीय महिला व शहरातील गंगशेट्टीवर ले आऊट मधील 27 वर्षीय महिला यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्यांनी वणीतील खाजगी लॅब मध्ये कोरोना चाचणी केली असता त्या दोघींचे कोरोना अहवाल मंगळवार दि. 4 जानेवारी ला पॉझिटिव्ह (Positive) आले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात वणी शहरातील 4 रुग्ण कोरोना बाधित निघाले होते तर डिसेंबर महिन्यात कोरोनाचा एकही रुग्ण निष्पन्न झाला नाही. राज्यात कोरोनाचा विळखा वाढत असताना नव वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात दोन बाधित आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
वणी: बातमीदार