● डॉक्टर रजेवर, OPD सुरू करण्यास विलंब
वणी: राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रचंड अनागोंदी सुरू आहे. अनेक पदे रिक्त असून डॉक्टरच रजेवर असल्याने OPD समोर सोमवारी सकाळी रुग्णांची मोठी गर्दी उसळली होती. रुग्णाच्या नातेवाईकांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना सूचना दिली असता लेखी तक्रार करा असे उत्तर दिल्याने नागरिकांत रोष निर्माण झाला आहे.
राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चिखलीकर रजेवर आहेत. तर डॉ. चव्हाण ह्या OPD सुरू करण्याच्या निर्धारित कालावधीत पोहचत नसल्याने रुग्णांना ताटकळत राहावे लागत असल्याचा आरोप राजूर येथील ग्राम पंचायत सदस्यांनी केला आहे.
सोमवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाची प्रचंड गर्दी जमा झाली होती. त्यातच OPD सुरू न झाल्याने अनिल डवरे, अमित कर्मनकार, मांदाडे, प्रशांत डांगरे, आकाश पोहे, निकेश पोहे, शरद मेश्राम, अमोल आत्राम, भोला कोडापे यांनी रुग्णाची होत असलेली कुचंबणा बघून डवरे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित शेंडे यांना मोबाईल वरून कळवले मात्र त्यांनी लेखी तक्रार करा असे सांगितल्याने ग्राम पंचायत सदस्य संतप्त झाले.
या प्रकरणी सरपंच विद्या पेरकावार यांनी पंचायत समिती सभापती यांचेकडे तक्रार करत विहित मुदतीत OPD उघडावी तसेच औषधी निर्माता अनुपस्थित असल्याचे सांगितले. यासर्व घडामोडी नंतर 10: 30 वाजता डॉ. चव्हाण यांनी OPD सुरू केली असून औषधी वाटपाकरिता एका सिस्टर ला बसविण्यात आले आहे. मात्र सातत्याने आरोग्य विभागामार्फत होत असलेली अनागोंदी थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे.
वणी: बातमीदार