● आज पुन्हा 4 रुग्ण, सतर्कता बाळगणे गरजेचे
वणी: वणीकर नागरिक कोरोना संसर्गजन्य आजाराला फार हलक्यात घेतांना दिसत आहे. बाजारपेठेतील गर्दी, कोविड नियमाची अवहेलना आणि सातत्याने वाढणारे रुग्ण भविष्यातील तिसऱ्या लाटेची तीव्रता दर्शवत आहे. नवं वर्षातील केवळ 17 दिवसात तब्बल 40 कोरोना बाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग प्रचंड वाढला आहे, दरदिवशी तालुक्यात रुग्ण वाढताहेत. 1 जानेवारी पासून 17 जानेवारीपर्यंत तब्बल 40 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असले तरी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सुद्धा चांगली आहे.
सोमवारी प्राप्त अहवालानुसार तालुक्यात 4 कोरोना बाधित निष्पन्न झाले आहेत. त्याप्रमाणेच 4 जानेवारी ते 17 जानेवारी पर्यंत 40 कोरोना बाधित आढळलेत. 14 व 15 जानेवारीला अवघ्या दोन दिवसात 14 कोरोना बाधित आढळले आहेत.
कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोविड नियमाचे पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे. पालिका व महसूल प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. पालिकेने जनजागृती तसेच पथकाचे गठन करून किमान आपत्ती व्यवस्थापन करत असल्याचे दाखवून दिले आहे मात्र महसूल प्रशासन अद्याप मैदानात उतरले नाहीत.
कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने निर्गमित केलेले निर्बंध प्रशासनाने तातडीने अमलात आणल्यास काही प्रमाणात रुग्ण वाढीला आळा बसेल. या करिता जिल्हा प्रशासनाने काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
वणी: बातमीदार