● मंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश
वणी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा हे आपल्या सहकाऱ्यां सह दि 24 जानेवारीला काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. हा भव्यदिव्य प्रवेश सोहळा ऊर्जा मंत्री नितीन राऊत व मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत होत आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच ‘त्या’ पक्षाला ‘ग्रहण’ लागल्याचे सकृतदर्शनी दिसते. कालांतराने मंत्री धनंजय मुंढे यांचे सोबत डॉ. लोढा यांची सलगी असल्याने त्यांनी राष्ट्रवादीची धुरा यशस्वीपणे सांभाळत पक्षाला बऱ्यापैकी उभारी दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जिल्हा नेतृत्वाच्या असहकार्यामुळे डॉ. लोढा यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वणी विधानसभा क्षेत्रात पुन्हा पोरकी होणार आहे. डॉ. लोढा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षाचा “हात” मजबूत करण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेसच्या वतीने माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पक्ष प्रवेश सोहळा आयोजित केला आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात मागील काही महिण्यापासून माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेशाचा झंझावात निर्माण केला आहे. वेळोवेळी अन्य पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये रीतसर प्रवेश केला आहे. डॉ. महेंद्र लोढा हे आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याने वणी शहर व अदिवासी बहुल भागात पक्षसंघटन मजबूत होणार आहे.
वणी: बातमीदार