● संसदेत खा. धानोरकर गरजले
वणी: वणी विधानसभा क्षेत्रातील झरी जामनी तालुक्यातील मार्की व मांगली येथे टॉपवर्थ व बी. एस. इस्पात हे कोलब्लॉक आहेत. त्यांना नेमून दिलेल्या रॉयल्टी पेक्षा जास्त उत्खनन करीत असल्याचा गंभीर आरोप खा. बाळू धानोरकर यांनी संसदेत केला. शासनाला चुना लावणाऱ्या या दोन्ही खाणींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
झरी तालुक्यातील बी. एस. इस्पात मार्की मांगली – 3 व मे. टॉपवर्थ ऊर्जा ऍण्ड मेटल लि. मार्की – मांगली – 1 अशा दोन कोळसा खाणी आहेत. त्यांना विहित टन कोळसा उत्खनन करण्याची परवानगी शासनाने दिली आहे तेवढीच रॉयल्टी ते देतात मात्र क्षमतेपेक्षा अतिरिक्त कोळसा उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवत असल्याचा आरोप धानोरकरांनी केला आहे.
जिल्ह्यात खनिज व गौण खनिजाचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडत आहे. झरी तालुक्यातील त्या दोन्ही कोळसा खाणी व संबंधित अधिकारी यांचेवर कठोर कारवाई करण्यासाठी कोळसा मंत्री रावसाहेब दानवे यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
संसदेत खा. धानोरकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना कोळसा मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. अवैद्य उत्खनन करणाऱ्या कोळसा खाणीवर आता काय कारवाई होणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
वणी: बातमीदार