● धाकट्या मुलाचा प्रताप…!
● खैरी गावात स्मशान शांतता
वणी: कळंब तालुक्यातील खैरी गावात 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह बुधवार दि. 16 फेब्रुवारी ला गावालगत असलेल्या तलावा जवळ आढळला. शरीरावर धारदार शस्त्राने तब्बल 20 चे वर घाव करण्यात आले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बघताच तात्काळ पोलिसांना कळविण्यात आले. हत्येचे गूढ उकलताना पोलिसांना विविधांगी तपास करावा लागणार असून प्रथमदर्शनी धाकट्या मुलानेच जन्मदात्याला यमसदनी धडल्याचा थरार उघडकीस आला आहे.
भिमराव सोनबा घोडाम (65) रा. खैरी या वृद्धाचा बुधवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास गावालगत असलेल्या तलावा जवळ रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. प्रत्यक्षदर्शीनी या बाबत मृतकाच्या भावाला माहिती दिली. ग्रामस्थांनी तडक घटनास्थळी धाव घेत पोलिसांना कळवले. मृतकाच्या शरीरावर धारदार शस्त्रांचे घाव असल्याने हत्याच करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.
पोलिसांना सूचना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चौथनकर हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीजन्य पुरावा व घटनास्थळाचे निरीक्षण करून पंचनामा करण्यात आला. चार दिवसापूर्वी चौकीदार म्हणून काम करणाऱ्या मृतकाची पार्श्वभूमीवर तपास केंद्रित करण्यात येऊन संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.
मृतक भीमराव हा सतत पत्नीला मारहाण करत असल्याने ती माहेरी गेली होती. मागील 15 वर्षांपासून पत्नीपासून विभक्त होता. त्याला तीन मुले असून एक मुलगा त्याचे सोबत राहत होता तर दोन मुले आई सोबत घोटी या गावी वास्तव्यास होते. शेतीच्या उत्पन्नावरून त्यांच्यात वाद होत होते. त्यातच आईला दिलेल्या यातनेमुळे लहान मुलाच्या मनात वडीलांबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता.
तलावाच्या बांधकामावर चौकीदार म्हणून काम करीत असलेल्या वडीलाला कायमचे संपवायचे असा निर्धार लहान मुलगा हरिदास भीमराव घोडाम (26) याने केला. यासाठी त्याने मावसभाऊ गणेश ज्ञानेश्वर कासार (19) रा. कार्ली व मित्र चिंतामण शिबलेकर (25) रा. यवतमाळ यांची मदत घेत खैरी गाव गाठले आणि झोपेत असलेल्या जन्मदात्यावर चाकूने सपासप वार केले.
या प्रकरणी रुख्मा भीमराव घोडाम यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी संशयावरून तिघांना ताब्यात घेतले होते. कसून चौकशी केली असता मुलाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी भादंवि कलम 302, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अजित राठोड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
वणी: बातमीदार