● पंचायत समिती कार्यालयातील घटना
वणी : वारंवार फोन का करता या क्षुल्लक कारणावरून पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेल्या विस्तार अधिकाऱ्याने सचिवाच्या कानशिलात हाणल्याची घटना सोमवारी घडली. पंचायती समिती कार्यालयात घडलेल्या या घटने मुळे चांगलीच खळबळ उडाली असून प्रकरण पोलिसात पोहचले आहे.
गणेश सुखदे हे वेळाबाई व उकणी ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून काम पाहतात. वेळाबाई येथील घरकुलाची तयार केलेली यादी विस्तार अधिकारी सुरेश पाझारे यांच्या कडून तपासणी करायची होती. त्यामुळे ग्राम सचिव सुखदे यांनी सोमवारी सकाळी 10 वाजताचे सुमारास विस्तार अधिकारी पाझारे यांना फोन केला होता.
पाझारे यांनी मी हिंगणघाटला असून वणी येथे येत असल्याचे सांगितले. काही वेळाने सुखदे यांनी वणीत पोहचले का, हे माहीत करण्याकरिता पुन्हा फोन केला होता. पाझारे यांना भेटण्यासाठी सुखदे पंचायत समिती मधील त्यांच्या दालनात गेले होते मात्र पाझारे कृषी विभाग कार्यालयात बसून असल्याने सुखदे त्यांना भेटण्यासाठी तिथे गेले व घरकुलाच्या याद्या तयार झाल्या आहे त्याची तपासणी करा असे म्हटले.
आणि विस्तार अधिकाऱ्याने तुम्ही मला वारंवार फोन का करता असे म्हणत सचिव सुखदे यांच्या कानशिलात हाणली. या मारहाणीत सुखदे यांच्या डोळ्या जवळ मार लागल्याने त्यांनी याबाबत वणी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारी अंती विस्तार अधिकारी पाझारे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.
वणी: बातमीदार