Home Breaking News स्वतंत्र “आदिवासी” रेजिमेंट तयार करा..!

स्वतंत्र “आदिवासी” रेजिमेंट तयार करा..!

347

खासदार धानोरकर यांची लोकसभेत मागणी

वणी : भारतीय सैन्यात अशा अनेक रेजिमेंट आहेत, ज्यांची नावे काही समुदाय, उप-समुदायांवर आहेत. जसे की शीख रेजिमेंट, गोरखा रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, जाट रेजिमेंट, मराठा रेजिमेंट त्याच धर्तीवर आदिवासी लोकांसाठी स्वतंत्र “आदिवासी” रेजिमेंट तयार करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत केली.

देशातील मूलनिवासी हा आदिवासी समुदाय आहे. आदिवासी लोकांसाठी स्वतंत्र “आदिवासी” रेजिमेंट केल्यास आदिवासी समाजाचा आदर होईल आणि अधिकाधिक आदिवासी तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.

त्याच प्रमाणे आपल्या देशातील आदिवासी लोकसंख्या परंपरेने मागासलेली आणि उपेक्षित राहिली आहे. बहुसंख्य समाजाकडून नेहमीच अत्याचार आणि अपमान होत आले आहेत. या संदर्भात, आदिवासी लोकांसाठी काही शब्द वापरले जातात जे अत्यंत अपमानास्पद आणि आक्षेपार्ह आहेत.

आदिवासी लोकांना ‘वनवासी’ आणि ‘गिरिजन’ असे इतर शब्द वापरणे हे या समुदायांसाठी अपमानास्पद आहे. त्यांना ‘आदिवासी’ म्हटले पाहिजे. कारण ते या भूमीचे मूळ रहिवासी आहेत. अनुसूचित जातीच्या लोकांसाठी ‘हरिजन’ हा शब्द वापरण्यावर ज्याप्रमाणे बंदी घालण्यात आली आहे, त्याप्रमाणे आदिवासींसाठी अशा अपमानास्पद शब्दांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी सरकारने कायदेशीर पावले उचलली पाहिजेत. अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत केली.
वणी : बातमीदार