● वाहतूक शाखेचा दुटप्पीपणा
● खरी वाहतूक कोंडी होतेय बाजारपेठेत
वणी: सन-उत्सवाचा काळ आहे, बाजारपेठेत गर्दी उसळत आहे. शहरातील वाहतूक कोंडीस खऱ्या अर्थाने जबाबदार असणाऱ्यांना वाहतूक शाखा अभय देत असल्याचे वास्तव शनिवारी उजागर झाले. फूटपाथ वरील किरकोळ व्यावसायिकांना दांडूकेशहीचा धाक दाखवून हुसकावून लावले. बाजारपेठेतील प्रतिष्ठानासमोर अस्ताव्यस्त वाहने उभी असतात, वाहतूक कोंडी होते, त्या धनदंडग्यांना जाब कोण विचारणार असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
शहरातील अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. वाहतुकीस अडथळा होत असेल तर वाहतूक शाखा कारवाई करण्यास बांधील आहे. परंतु बाजारपेठेतील धनदांडग्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानापुढे पार्किंग व्यवस्थाच नाही. यामुळेच खऱ्या अर्थाने वाहतूक कोंडी होते. मात्र वाहतूक शाखेने आजपर्यंत संबंधितावर दंडात्मक कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.
शहरातील बाजारपेठ असो अथवा वर्दळीचे ठिकाण, तेथील व्यावसायिकांनी आपल्याच दुकानासमोर किरकोळ व्यावसायिकांना शासनाची जागाच भाड्याने दिलेल्या आहेत. दररोज 300 ते 500 रुपये संबंधित दुकानदार घेत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

वाहतूक शाखेने पदपथावरील किरकोळ व्यावसायिकांना हुसकवण्यापूर्वी लगतच असलेल्या गब्बर धनदंडग्यांना जाब विचारावा. त्यांनी प्रतिष्ठानापुढे कोणत्याही व्यवसायाला थारा देवू नये अशी तंबी द्यावी किंवा वाहतुकीस अडथळा होतो म्हणून त्यांचेवरच प्रतिबंधात्मक कारवाई करावी.
रस्त्यावरील व्यावसायिक वाहतुकीस अडथळा निर्माण करतातच मात्र याला सर्वस्वी जबाबदार कोण हे तपासणे गरजेचे आहे. अनेक दुकानासमोर पार्किंग व्यवस्था नाही त्यांचेवर वाहतूक शाखा काय कारवाई करणार आहे हे सुद्धा नागरिकांना कळणे गरजेचे आहे. निव्वळ सन उत्सव आहे म्हणून लहान व्यावसायिकांना वेठीस धरणे योग्य नाही.
वणी: बातमीदार