● मे हिट चा चटका एप्रिल मध्येच
● तापमानाची वाटचाल विक्रमाकडे
वणी: विदर्भात सुर्यदेवाचे रौद्ररूप बघायला मिळत आहे. तापमानाचा पारा कमालीचा वाढतोय, मे हिट चा चटका एप्रिल मध्येच नागरिकांना सहन करावा लागत असून तापमानाची वाटचाल विक्रमाकडे होतांना दिसत आहे. वणी शहर व परिसरात अघोषित ‘संचारबंदी’ चा प्रत्यय येताहेत.
विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा हे जिल्हे 45 अंश सेल्सिअस च्या पुढे सरकताहेत. त्यातच हवामाना खात्याने पुढील चार ते पाच दिवस विदर्भात उष्ण लहरींची शक्यता वर्तविली आहे. दि. 29 एप्रिल ला चंद्रपूरात 46.4 अंश सेल्शिअश तापमानाची नोंद हवामान खात्याने केली यामुळे तापमानाच्या बाबतीत चंद्रपूरने जगात पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.
विदर्भात 45 अंश सेल्शिअश तापमान पार केलेल्या जिल्ह्यामध्ये अकोला 45.8, अमरावती 45, ब्रम्हपुरी 45.6, नागपूर 45.2, वर्धा 45.5 तर यवतमाळ 45.2 अंश तापमानात आघाडीवर आहेत. त्यानंतर बुलढाणा 42.8, गडचिरोली 42.4, गोंदिया 43.8, वाशीम 43.5 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद घेण्यात आलेली आहे
सकाळी अकरा वाजतापासून सूर्यदेव आग ओकत आहे. दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत नागरिक बाहेर पडत नसल्याने रस्ते ओसाड दिसून येत आहेत. अघोषित संचारबंदी चा प्रत्यय येत असून घरगुती वातानुकूलित यंत्र सुद्धा ऐनवेळी दगा देताहेत. शहरात शितपेयाची दुकाने सकाळी व सायंकाळी गजबजलेली दिसत असली तरी नागरिकांनी उष्माघातापासून स्वतः चा बचाव करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वणी: बातमीदार