● उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय
वणी: शिरपूर व वणी पोलीस स्टेशन हद्दीत गुरुवार दि.2 जून ला दोघांचे मृतदेह आढळले. त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असले तरी उष्माघाताने मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कुरई शिवारातील स्मशानभूमी लगत एक व्यक्ती मृतावस्थेत आढळला. स्थानिक नागरिकांनी याबाबत शिरपूर पोलिसांना सूचित केले. तसेच त्याची ओळख पटविण्यात आली असता तो व्यक्ती परमडोह येथील नितीन नारायन काकडे (36) असल्याचे निष्पन्न झाले.
नितीन हा विवाहीत असुन त्याला एक मुलगा आहे. पत्नी सोबत काही कारणास्तव वाद झाला होता यामुळे ती 15 दिवसांपूर्वी माहेरी गेली होती असे बोलल्या जात आहे. यामुळेच नितीन नैराश्याने ग्रासला होता त्यातच वाढलेले प्रचंड तापमान आणि त्याच्या वणवण भटकंतीमुळे उष्माघाताचा फटका बसला असावा असे बोलल्या जात आहे.
येथील साई मंदिर परिसरात गुरुवारी दुपारी विजय बाबाराव मोहुर्ले (52) हा व्यक्ती मृतावस्थेत आढळून आलेत. ते मारेगाव तालुक्यातील हिवरा ( मजरा) येथील निवासी होते. या दोन्ही घटनेतील मृतकाचे शवविच्छेदन येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे.
शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र प्रथमदर्शनी उष्माघातानेच मृत्यू झाला असावा असा कयास वर्तविण्यात येत आहे.
वणी: बातमीदार