● प्रकरण वनोजादेवी येथील विवाहितेचे
वणी: मंगळवार दि. 7 जूनला विवाहितेने पारवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिटवी या गावी सासुरवाडीत गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी येथे राहणाऱ्या मृतकाच्या भावाने ती आत्महत्या नसून हत्याच असल्याचा आरोप केल्याने पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
सुवर्णा सतीश गंडे (23) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. ती वनोजादेवी येथील सुरेश शंकर बुच्चे यांची मुलगी अडून तिचा विवाह 2019 मध्ये घाटंजी तालुक्यातील टिटवी येथे वास्तव्यास असलेल्या सतीश वासुदेव गंडे (28) याचे सोबत झाला होता. लग्नानंतरचे काही दिवस आनंदात गेले, त्यांच्या संसारवेलीवर एक फुल उमलले. आणि येथूनच घरगुती कलहाची ठिणगी पडली.
सुवर्णाला झालेले बाळ मोठ्या भावाला दत्तक देण्यासाठी तिचाच पती तिला तगादा लावत होता. याकरिता तिचा विरोध होता, घरात कलहाला सुरवात झाली, यामुळे सुवर्णा चार महिण्यापूर्वी माहेरी आली होती. तिची समजूत काढून सर्व सुरळीत होईल असे सांगून तिला सासरी पाठवले.
सासरची मंडळी मात्र काहीही ऐकायला तयार नव्हती, मूल दत्तक देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. त्यातच तिला शारीरिक व मानसिक त्रास देण्यात येत होता. यामुळे त्रस्त सुवर्णाने मंगळवारी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
घटनेची माहिती सुवर्णाच्या माहेरी कळविण्यात आली. माहेरची मंडळी रात्रीच टिटवी येथे पोहोचली. मृतकाच्या शरीरावरील आढळून आलेल्या जखमा बघून माहेरच्या मंडळींना संशय आला. बहिणीची हत्याच झाल्याचा आरोप करत तिच्या मृत्यूस पती सतीश गंडे, विशाल गंडे, कविता गंडे आणि सासू कुसुम गंडे हे सर्व कारणीभूत असल्याचा आरोप दाखल केलेल्या तक्रारीतून केला आहे. पोलिसांनी भादवि कलम 304 b,306, 498 a, 323, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
वणी: बातमीदार