Home Breaking News अबब….शिरपूर- शिंदोला मार्गावर साचले ‘तळे’

अबब….शिरपूर- शिंदोला मार्गावर साचले ‘तळे’

634

नागरिकांना सहन कराव्या लागतात यातना

सुनील पाटील : तालुक्यातील मार्गाची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. ‘प्रशासन सुस्त तर जनता त्रस्त’ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन दिवसात कोसळलेल्या पावसाने शिरपूर- शिंदोला मार्गावर चक्क तळे साचल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.

उप विभागातील जिल्हा, राज्य व महामार्गाची झालेली दुरवस्था सर्वश्रुत आहे आणि कुंभाकर्णी झोपेतील प्रशासनला जागे कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. अतिशय रहदारी असणाऱ्या या मार्गावर वाहन चालकांना मार्गक्रमण करणे जोखमीचे झाले आहे.

राज्यात हरित क्रांती करण्यासाठी तत्कालीन सरकाने महत्वाकांक्षी जलसिंचन, जलसंधारण बाबतचे धडक कार्यक्रम राबवले. मात्र त्यात कोणाचे चांगभले झाले हे स्थानिकांना चांगलेच अवगत आहे. आता राज्य मार्गावर सुद्धा जलसिंचन होत असल्याने ‘त्या’ सरकारची महत्वाकांक्षा पूर्णत्वास जात आहे.

वणी उप विभागातील रस्त्याची ‘वाट’ कशी व कोणी लावली हे प्रशासनाला चांगलेच अवगत आहे. रस्ता वाहतुकीची क्षमता लक्षात न घेता निर्माण करण्यात आलेले किंबहुना निर्माणाधिन रस्ते ‘त्या’ वहन क्षमतेचे का निर्माण करण्यात येत नाही हाच खरा मुद्दा आहे.

या मार्गाच्या दुरुस्तीसाठी सातत्याने नागरिकांनी केलेल्या मागणीचा विचार करण्याची तसदी शासन, प्रशासन घेत नसल्याने नागरिकांनाच आता उठाव करावा लागणार आहे. तसेच रस्त्यावर साचलेल्या ‘तळ्यात’ मत्स्य पालनाचा निर्णय जनतेला घ्यावा लागणार का हा संशोधनाचा विषय आहे.
वणी: बातमीदार