Home Breaking News चक्क….घोंसा गावात शिरले पाणी, विदर्भा कोपली

चक्क….घोंसा गावात शिरले पाणी, विदर्भा कोपली

1167

तालुक्यात पावसाचा झंझावात

वणी: परिसरात पावसाचा झंझावात बघायला मिळत आहे. पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे, सर्वत्र कोसळणाऱ्या पावसाने नदी, नाले दुथडीभरून वाहत असतानाच आता गावात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली असून घोंसा परिसरातील विदर्भा नदी कोपली आहे. गावात पाणी शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात सर्वत्र पावसाने चांगलाच जोर धरला आहे. नदी, नाल्यांना पूर आलेला असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे. तरी सुद्धा अद्याप तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. महसूल प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

तालुक्यातील घोंसा येथे विदर्भा नदीने उग्र रूप धारण केले आहे. घोंसा या गावात पाणी शिरले यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदी काठावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावं असं प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

कोसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी नाल्याला पूर आलेला आहे. अनेक मार्ग प्रभावित झाल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. आबई फाट्या जवळील नवीनतम बांधकाम होत असलेल्या वळण मार्गावरील पुलाजवळ पाण्याचे रौद्ररूप दिसत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

तालुक्यात वर्धा, पैनगंगा, विदर्भा आणि निर्गुडा अशा चार नद्या प्रवाहित आहे. या सर्व नद्या आणि तालुक्यातील नाले दुथडीभरून वाहताहेत. नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी वास्तव्य करावं असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

वणी: बातमीदार