● विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंचे वक्तव्य
वणी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा विदर्भ दौरा आटोपला. त्यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे महाराष्ट्र सैनिकांत उत्साह संचारला आहे. चंद्रपुरात असताना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, 2024 ला मी ‘राजू’ ला आमदार म्हणून बघतोय. असे वक्तव्य करून विधानसभा निवडणुकीतील ‘राज’नीती काय असेल हे अधोरेखित केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुका सोबतच पक्षबांधणीसाठी राज ठाकरे मैदानात उतरल्याचे दिसत आहे. पाच दिवसांचा झंझावाती विदर्भ दौरा झाला. यावेळी त्यांनी प्रस्थापितांशी लढण्याचा निर्धार बोलून दाखवला. जिथे जो कुणी प्रस्थापित असेल तिथे मनसे लढणार, असं ‘रोखठोक’ वक्तव्य त्यांनी केलं. या दौऱ्याचे नियोजन राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केले होते.
“प्रत्येकजण ज्यावेळी मोठा होतो, त्यावेळी तो प्रस्थापितांविरोधात लढूनच मोठा होतो. हा विदर्भ पहिल्यांदा ओळखला जायचा तो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून. मग भाजपने प्रस्थापित काँग्रेसविरोधात लढा दिला आणि विदर्भ काबीज केला. म्हणजेच प्रस्थापितांविरोधात लढा देऊनच मोठं होता येतं. जर विदर्भात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल असे सूतोवाच राज ठाकरे यांनी केले.
वणी विधानसभा मतदार संघ पूर्वी काँग्रेस चा बालेकिल्ला होता, त्याला छेद देत एकवेळा शिवसेनेने बाजी मारली. मात्र मागील दहा वर्षांपासून भाजपाचा एकछत्री अमल मतदारसंघावर दिसून येत आहे. प्रस्थापितांविरुद्ध लढताना मनसेला योग्य नियोजनबद्ध रणनिती आखावी लागणार आहे. संघटनात्मक बांधणी, पक्षीय अजेंडा आणि जनमानसात राज ठाकरे यांचे विचार रुजवावे लागणार आहे.
मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी विदर्भातील वणी विधानसभा मतदार संघात आपले वलय निर्माण केले आहे. कडवट व निष्ठावंत महाराष्ट्र सैनिकांची फौज त्यांच्या जवळ आहे. वर्षभर झपाटल्यागत सामाजिक, जनहितार्थ उपक्रम ते राबवताना दिसतात तर आपत्ती च्या वेळी धावून जाण्याची त्यांची वृत्ती यामुळे मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा “ग्राफ” वाढताना दिसत आहे.
वणी: बातमीदार