Home Breaking News ठाणेदारांनी डॉक्टरांना केली पाच लाखाची मागणी ..!

ठाणेदारांनी डॉक्टरांना केली पाच लाखाची मागणी ..!

3517

SP समोरच केला गौप्यस्फोट

रोखठोक डेस्क: अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी ठाणेदारांनी पाच लाखाची मागणी केली. असा गंभीर गौप्यस्फोट पोलीस अधीक्षक (SP) डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्या समक्ष डॉ. महेंद्र लोढा यांनी केल्याने पोलीस प्रशासनाची कार्यपद्धती चव्हाट्यावर आली आहे.

बुधवारी पहाटे अनपेक्षितपणे चोरट्याने पत्रकारावर प्राणघातक हल्ला केला. याचे शहरात चांगलेच पडसाद उमटले पत्रकार संघटना एकवटल्या. आमदारांना निवेदन देत ठाणेदारांची तात्काळ उचलबांगडी करावी अशी मागणी करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी तातडीने वणी गाठून पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी डॉ. लोढा यांनी सर्वांसमोर आपबिती कथन केली.

येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलीचा अति रक्तस्त्राव होत असल्याने आई- वडिलांच्या सूचनेवरून गर्भपात करण्यात आला होता. याप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा म्हणून येथील सामाजिक कार्यकर्त्याने पोलीस महानिरीक्षक यांचेकडे तक्रार दाखल केली होती. याच बाबतीतला निपटारा करण्यासाठी ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला.

ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांची ठाणेदार म्हणून मेरिट वर निवड करण्यात आल्याचे छातीठोकपणे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले. तसेच गुन्ह्याचा तुलनात्मक व संख्यात्मक आलेख वाचून दाखवत ठाणेदारांचीच पाठराखण केली. तर ठाणेदारांच्या बदलीसाठी पत्रकारांनी “सुपारी” घेतल्याचा दावा करत ठाणेदारांच्या कार्यपद्धतीवर पांघरूण घातले.

डॉ. महेंद्र लोढा यांनी केलेल्या आरोपावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. परंतु लहानसहान तक्रारीच्या आधारे यापूर्वी कारवाया करण्यात आल्यात. अनेक कर्मचाऱ्यांना कंट्रोल रूम मध्ये जमा केले. शहरात अनागोंदी सुरू असताना ठाणेदारांची होत असलेली पाठराखण मात्र संशोधनाचा विषय झाला आहे.
वणी: बातमीदार