Home Breaking News तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीत महिला शासन

तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीत महिला शासन

399

17 ग्रामपंचायती साठी होणार मतदान

रोखठोक | तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. एक अविरोध तर एका ग्रामपंचायतीने बहिष्कार टाकला आहे. 17 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार असून 54 मतदान केंद्रावर 11 हजार 663 स्त्री व 12 हजार 601 पुरुष असे 24 हजार 264 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर बारा ग्रामपंचायतीत महिला शासन असणार आहे.

गावपातळीवरील निवडणुका अतिशय रंगतदार होत असतात. कार्यकर्ते एकमेकांच्या गटाविरुद्ध रणशिंग फुंकून निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरतात मात्र मतदार कोणाच्या बाजूने हे मात्र अखेरच्या क्षणापर्यंत कळत नाही. त्यातच उमेदवारांची होणारी दमछाक, पक्षनिहाय कार्यकर्त्यांची जुळवाजुळव ही अग्निपरीक्षाच असते.

तालुक्यात भाजप, काँग्रेस, मनसे, शिवसेना ( उद्धव ठाकरे गट) यांचे प्राबल्य आहे. ग्रामपंचायत ताब्यात असावी याकरीता राजकीय पक्षाचे पुढारी आपापल्या परीने रणनिती आखताहेत. तालुक्यातील शहरालगत असलेल्या दोन ग्रामपंचायतीत तुल्यबळ लढती बघायला मिळत असून विजयी झेंडा कोण फडकवणार हे मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे.

तालुक्यातील बोर्डा, ब्राम्हणी, गणेशपूर, कुरई, मंदर, मेंढोली, साखरा (दरा), वारगाव, वरझडी, वेळाबाई, चिखलगाव व कळमना या बारा ग्रामपंचायतीत महिला सरपंच आरूढ होणार आहेत. निवडणुकीची खरी लढत चिखलगाव व गणेशपूर येथे बघायला मिळत आहे. तर पुरड ( नेरड ) येथे सर्व सदस्य अविरोध झाले मात्र सरपंच पदांसाठी रस्सीखेच सुरू आहे.

चिखलगाव येथे शिवसेनेचे सुनील कातकडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांना रोखण्यासाठी भाजपा व काँग्रेस यांनी कंबर कसली आहे. त्या प्रमाणेच गणेशपूर येथे विद्यमान सरपंच तेजराज बोढे यांनी सरपंच पदाचे उमेदवार म्हणून पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार आहे.
वणी : बातमीदार

Previous articleवाद विकोपाला…पतीनेच पत्नीला चाकूने भोसकले
Next articleखळबळ…..तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्षासह 24 नगरसेवकांवर गुन्हे दाखल
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.