● आंतरराज्यीय टोळीचा होणार पर्दाफाश
रोखठोक | राष्ट्रीय महामार्ग तस्करीचा स्रोत तर बनला नाही ना अशी शंका निर्माण होत आहे. नागपूर वरून हैद्राबाद कडे जात असलेल्या कंटेनरची झाडाझडती घेतली असता तब्बल 39 लाख रुपयांच्या प्रतिबंधित तंबाखूची खेप ताब्यात घेण्यात वडकी पोलिसांना यश आले आहे. सोमवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत 75 लाख 6 हजाराचा मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
वडकी पोलीस स्टेशन चे ठाणेदार सपोनि विनायक जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी पथकासह राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला. प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करत असताना तपकिरी रंगाचा कंटेनर क्रमांक NL- 01- AE 6644 ची झाडाझडती घेतली. यावेळी त्या वाहनात प्रतिबंधित तंबाखू व गुठख्याचा साठा आढळून आला.
सलीम उस्मान वय (31) व साहेल मकुल (20 )हे दोघेही राहणार अलमपूर जि. भरतपूर (राजस्थान) येथील निवासी आहेत. पोलीस कारवाईत त्यांना ताब्यात घेण्यात आले असून कसून चौकशी सुरू आहे. याप्रसंगी कंटेनर मधून 39 लाख 6 हजार रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू , गुटखा व 36 लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण 75 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

वडकी पोलिसांनी केलेल्या कारवाईत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश होणार आहे. सखोल चौकशीअंती मोठे मासे किंबहुना तंबाखू सम्राट गळाला लागणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रतिबंधित तंबाखूची तस्करी करणारे अनेक महाभाग परिसरात उजळ माथ्याने वावरत आहे. त्यांच्यावर वचक बसवणे पोलिसांचेच आद्य कर्तव्य आहे कारण संबंधित विभाग कुंभकर्णी झोपेत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक जाधव, चालक विनोद नागरगोजे, विलास जाधव, शंकर जुमनाके यांनी केली.
वणी: बातमीदार