Home Breaking News आणि…नववधूसह पाच जणांचा मृत्यू ..एकुलत्या एक भावाचा समावेश

आणि…नववधूसह पाच जणांचा मृत्यू ..एकुलत्या एक भावाचा समावेश

2108
C1 20240404 14205351

अन् सुखी संसाराचे स्वप्न भंगले

उमरखेड : सुखी संसाराचे स्वप्न घेवून माहेरी निघालेल्या नववधूच्या हातावरील मेहंदी रक्ताने माखली अन् सुखी संसाराचे स्वप्न भंगले. सोमवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात नववधूसह पाच जणांचा मृत्यू झाला असून यात तिच्या एकुलता एक भावाचा समावेश आहे. या घटनेमुळे साखरा या गावावर शोककळा पसरली आहे.

अवघ्या तीन दिवसापूर्वी आयुष्यभराची साथ देण्याचे वचन देत सात फेरे घेतलेली नववधू व तिच्या नातेवाईकांसाठी सोमवारचा दिवस ‘काळरात्र’ ठरली. तालुक्यातील साखरा येथील पूजा ज्ञानेश्वर पामलवाड (21) हिचा विवाह जारीकोट ता. धर्माबाद येथील नागेश साहेबराव कन्नेवाड (25) याचे सोबत 19 फेब्रुवारी ला झाला होता.

सोमवार दि. 21 फेब्रुवारी ला मांडव परतणीसाठी जारीकोट येथून साखरा येथे भोकर मार्गे महिंद्रा मॅक्झिमो मिनी व्हॅन क्रमांक एम.एच.29 एआर 3219 ने जात असतान सोमठाणा जवळ सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच. 04 एएल 9955 ने जबर धडक दिली. या अपघातात मिनी व्हॅनचा अक्षरशः चुराडा झाला.

या भीषण अपघातात पूजा ज्ञानेश्वर पामलवाड (20) रा. साखरा, हिच्यासह सख्खा भाऊ दत्ता ज्ञानेश्वर पामलवाड (22) व चुलत भाऊ पपडू परमेश्वर पामलवाड, नवरदेवाचा आते भाऊ माधव पूरभाजी सोपेवाड व वाहन चालक सुनील दिगंबर थोटे (30) रा. चालगणी, ता. उमरखेड असा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. तर सहा जखमींवर उपचार सुरू आहे.

अपघातात नववधूसह पाच जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. नववधूसह तिचा एकुलता एक भाऊही या अपघातात दगावल्याने साखरा गावावर शोककळा पसरली आहे. पामलवाड यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य होती. या भीषण अपघाताने नवरी मुलीसह तिच्या भावाचाही मृत्यू झाल्याने पामलवाड कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.
उमरखेड: बातमीदार