Home वणी परिसर राजूर ग्रा.पं.च्या मासिक सभेला सदस्यांची दांडी

राजूर ग्रा.पं.च्या मासिक सभेला सदस्यांची दांडी

247

कोरम अभावी मासिक सभा रद्द
ग्रामविकासाला खीळ बसण्याचा धोका

तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत व औद्योगिक क्षेत्र असलेल्या राजूर गावात विकास कामांना खीळ बसत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दर महिन्याला होणाऱ्या ग्रामपंचायतच्या मासिक सभेला फार महत्व असते. मात्र या मासिक सभेत निवडून आलेले सदस्यच गैरहजर राहून दांडी मारत असतील तर गावाचा विकास कसा होणार, हा प्रश्न निर्माण होतो आहे.

दहा हजाराचे वर लोकसंख्या असलेली व 17 सदस्यीय असलेल्या राजूर ग्रामपंचायतीला दरवर्षी कोटी रुपयांचा निधी येत असतो. त्यातल्या त्यात तीन हजारापेक्षा जास्त घरे व चुना भट्ट्या व कोळसा खान असल्याने मोठ्या प्रमाणावर कर सुद्धा जमा होत असतो. त्यामुळे राजूर ग्रामपंचायत ही कोट्यवधी रुपयांचे उलाढाल करणारी ग्रामपंचायत आहे.

राजूर गावातील विकास कामे व्हायला पाहिजे त्या अनुरूप होत नसल्याने खेडे गावातील विकास कामासमोर राजूर ची अवस्था लाजिरवाणी दिसते. अजूनही गावात रस्ते, नाल्या, प्रदूषण, नाल्या साफसफाई, पथदिवे, नळयोजनेची तारांबळ, कचरा विल्हेवाट, आदी समस्या आ वासून उभ्या ठाकल्या आहेत.

अशी गावाच्या विकासाची बिकट परिस्थिती असताना मात्र ग्रापं सदस्य दर महिन्याला विकासाची योजना करून विकासाला पुढे नेण्या ऐवजी होणाऱ्या मासिक सभेलाच दांडी मारत असल्याने मासिक सभाच तहकूब करावी लागत आहे. 17 सदस्यांमधून 9 सदस्य असल्याखेरीज कोरम पूर्ण होत नसल्याने ग्रामसेवकाना मासिक सभा तहकूब करावी लागत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

हा प्रकार पूर्णपणे येथील विकासाला खीळ घालण्याचा आहे. मासिक सभेला ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती नसणे ह्याला सत्ताधारी व विरोधक दोन्ही सारखेच जवाबदार आहेत. दोन्ही बाजूचे सदस्य गैरहजर असतात. ज्यांना गावाचा विकासाशी काहीही देणेघेणे नाही असे हवसेनवसे लोकप्रतिनिधी बनत असतील तर विकासाची गंगा वाहणारच कशी? हा प्रश्न प्रकर्षाने उपस्थित आहे.
राजूर कॉलरी: बातमीदार