Home Breaking News त्या…आक्रमक शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

त्या…आक्रमक शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

697

वाढीव मोबदला मिळेपर्यन्त कामबंद

उमरखेड: नागपूर -बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 मध्ये संपादीत केलेल्या भूसंपादनाचे अदा केलेले मोबदले अत्यल्प आहे. त्यातच लवाद न्यायालयाचा निर्णयानुसार वाढीव मोबदला देण्यास बांधकाम कंपनी सातत्याने टाळाटाळ करीत असल्याने आक्रमक झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी दि. 22 फेब्रुवारीला सद्‌भाव इम्फ्रॉस्ट्रक्चर कंपनीच्या कॅम्प जवळ धडक देत ठिय्या आंदोलन केले.

दहा दिवसापूर्वी पीडित शेतकऱ्यांनी उप विभागीय अधिकारी यांना निवेदन देत आपल्या मागण्या रेटून धरल्या होत्या. तसेच 12 फेब्रुवारी ला राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक नांदेड यांना लवाद न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे शेतकऱ्यांना अपिल न करता मोबदला द्यावा व सर्व शेतकऱ्यांची प्रकरणे वेळकाढू धोरण बाजूला सारून तत्काळ निकाली काढावी अशी विनंती केली होती.

याप्रकरणी हायवे प्रशासनाने ठोस निर्णय न घेता गळचेपी भूमिका अवलंबत असल्याने शेकडो शेतकरी आक्रमक झालेत. बुधवारी सकाळी 10 वाजता सद्‌भाव इम्फ्रॉस्ट्रक्चर कंपनीच्या कॅम्प समोर ठिय्या आंदोलन केले. शेतकरी हित लक्षात घेता उपविभागिय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी मध्यस्थी करत कंपनी प्रशासनाचे जनसंपर्क अधिकारी किशोर चौधरी व सहाय्यक विजय राठोड यांचे सोबत चर्चा करत तात्काळ तोडगा काढावा अशा सूचना दिल्या.

यावेळी कंपनी प्रशासनाने आश्वस्त करत जमिनीचा योग्य मोबदला मिळण्याचा निर्णय होई पर्यन्त नागेशवाडी ते मार्लेगाव बायपास रोड वरील बाधीत शेतकऱ्यांच्या हद्दी पर्यन्त काम बंद ठेवण्यात येईल असे स्पष्ट केले. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. बाधित शेतकऱ्यांचे नेतृत्व सुरेंद्र कोडगीरवार व अरविंद भोयर यांनी केले तर ठाणेदार अमोल माळवे यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.
उमरखेड : बातमीदार