Home Breaking News त्या…. सुपारीबहाद्दराच्या शोधार्थ पोलिसांची दोन पथके

त्या…. सुपारीबहाद्दराच्या शोधार्थ पोलिसांची दोन पथके

1372

मुख्य आरोपीसह तिघे न्यायालयीन कोठडीत

वणी: तालुक्यातील नायगाव फाट्यावर गुरुवार दि. 18 ऑगस्ट ला सायंकाळी शिक्षिकेवर प्राणघातक चाकूहल्ला करण्यात आला होता. पत्नीला संपवण्याची सुपारीच पतीने दिल्याची खळबळजनक बाब पोलीस तपासात पुढे आली होती. या घटनेतील तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र खऱ्या सुपारीबहाद्दरचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके कार्यान्वित केली. तर मुख्य आरोपीसह तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पती आणि पत्नीचे नाते हे विश्वास आणि प्रेम यावर टिकलेले असते. परंतु बारा वर्षांपूर्वी झालेला विवाह सुरवातीपासूनच खडतर आणि संशयाने ग्रासलेला होता. त्यातच या उभयतांना दोन अपत्य झाली. आतातरी संसार सुखकर होईल असे वाटत असताना त्यांनी एकमेकांवरचा विश्‍वास गमावला. संशयाने विक्राळरुप धारण केले. खटके उडत होते, वाद उफाळून येत होता.

पती जितेंद्र मशारकर (42) याने पत्रकारितेत चांगला जम बसवला तर पत्नी वैशाली छल्लावार (40) ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. पत्नीचे मासिक वेतन चांगले तर पतीचे राजकीय वर्तुळात वजन. आर्थिक आवक बऱ्यापैकी असल्याने स्थिरस्थावर मालमत्ता घेण्यात आली ती पत्नीने स्वतःच्या नावे केली. यामुळे पुन्हा दोघांच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाली.

पत्नीला कायमचे संपवल्यास सर्व मालमत्ता आपली व कायदेशीर वारस सुद्धा आपणच असा दानवी विचार डोक्यात आणून रणनीती आखली. तिला संपवण्याचा प्रयत्न यापूर्वी सुद्धा केला. यावेळी त्याने आपला मित्र (पसार सुपरिबहाद्दर) याला विश्वासात घेवून प्लॅन आखला यासाठी संजय पट्टीवार (30) याची मदत घेत महमंद राजा अब्बास अन्सारी (20) याला मोहिमेवर पाठवले. परंतु काळ आला होता पण वेळ आली नव्हती, शिक्षिका थोडक्यात बचावल्या.

शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि गजानन करेवाड यांनी पोलीस उप निरीक्षक रामेश्वर कंदुरे व कर्मचारी यांच्यासह कसून तपास केला. मुख्य आरोपीसह दोघांना ताब्यात घेतले. पोलीस कोठडी घेण्यात आली असता प्रकरणाचा 90 टक्के तपास पूर्ण करण्यात आला. सोमवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर पसार आरोपीच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहे.
वणी: बातमीदार