Home वणी परिसर भास्कर पेरे पाटलांचे उद्बोधन, हास्याचे फव्वारे

भास्कर पेरे पाटलांचे उद्बोधन, हास्याचे फव्वारे

1686

गुरुदेव अर्बन निधीच्या वतीने सरपंचाचा सत्कार

गुरुदेव अर्बन निधीच्या वतीने जिल्हा बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार दि. 22 नोव्हेंबर ला तालुक्यातील सरपंचाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून भास्कर पेरे पाटील यांनी तुफान फटकेबाजी करीत उद्बोधन केल्याने वणीकर मंत्रमुग्ध झाले.

शेतकरी मंदिरात आयोजित सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थानी खा. बाळू धानोरकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आ.वझाहत मिर्झा, आ. प्रतिभा धानोरकर, माजी आ.वामनराव कासावर, टिकाराम कोंगरे, अँड. देविदास काळे. विनोद पटोले, नरेंद्र पाटील ठाकरे, अरुणा खंडाळकर, प्रमोद वासेकर, आशिष मोहितकर, संजय खाडे, इजहार शेख यांची उपस्थिती होती.

कोरोना कालखंडात उत्तम पद्धतीने कोरोना योध्याची भूमिका पार पडणाऱ्या तालुक्यातील सरपंचाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना भास्कर पेरे पाटलांनी आपल्या उद्बोधनातून चौफेर फटकेबाजी करीत हास्याचे फवारे उडवले.

सरपंच पदाची आदर्श कारकीर्द गाजवणारे पटोदा चे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी स्वतःच्या गावात केलेल्या विकास कामाची जंत्रीच उपस्थितांना सांगितली. राज्यात आतापर्यंत 7 हजार आमदार झालेत पण त्यांचे स्वतःचे गाव स्वच्छ झाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गावाच्या विकासाची भिस्त ग्रामपंचायतीवर आहे असे म्हणत पंतप्रधानांपेक्षा सरपंचांची जबाबदारी मोठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंधरा मिनिटात खा. धानोरकर मला आवडायला लागले, तर ते त्यांच्या सौ ला किती आवडत असेल असे म्हणत त्यांनी हास्य फुलवले. माझ्या गावात मोठ्या प्रमाणात झाडे लावली आहे. वडाचे झाड प्रत्येक घरी लावले आहे. महिला त्या झाडांची पूजा करतात. मात्र तुम्ही तुमच्याच वडाची पूजा करा दुसऱ्यांच्या वडाची करू नका असे म्हणत उपस्थितांमध्ये विनोदाचे फवारे उडविले.

अध्यक्षीय भाषणात बोलताना खा. बाळू धानोरकर यांनी सरपंचांनी स्वनेतृत्व ओळखायला पाहिजे. त्यांनी सचिवाची बॅग घेऊन मागे फिरण्यापेक्षा योजना समजून घेत निधीचा योग्य वापर केला पाहिजे. मी रोजगाराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लोकसभा क्षेत्रात बंद अवस्थेत असलेले उद्योग धंदे सुरू करण्याकरिता संघर्ष करत आहे. पंतप्रधानासमोर लोकसभा क्षेत्रातील 16 समस्या मांडल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. प्रतिभा धानोरकर यांनी महिला सक्षमी करणावर मार्गदर्शन केले. महिला सरपंच्यांनी पदाची गरिमा ओळखत गावाच्या विकासाठी काम करा, असे म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे महत्त्व उपस्थित महिलांना पदाधिकाऱ्यांना पटवून सांगितले. कार्यक्रकामाचे संचालन नागपूर येथील गायत्री कोंगरे ताजने यांनी तर आभार गुरुदेव अर्बन निधी लिमिटेड उपाध्यक्ष आशिष मोहितकर यांनी मानले.
वणी: बातमीदार